मुंबई : शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात उद्यापासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून मोठ्या प्रमाणवर दुधाची आवक येणार आहे

मुंबईला कुठून किती दूध आवक होते?

मुंबईला दररोज 60 लाख लिटर दुधाची गरज भासते.

  • इंदापुरातील सोनाई डेरी 18 ते 20 लाख लिटर संकलन आहे. त्यातील मुंबईला दररोज एक लाख लिटर दूध पाठवलं जातं.

  • अमूलकडून मुंबईत दररोज 11 लाख लिटर दूध विकलं जातं.

  • कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे दररोज मुंबईला 7 लाख लिटर, तर वारणा दूध संघाचे अडीच लाख लिटर दूध मुंबईला जाते.

  • नाशिकहून मुंबईला 1 लाख 80 हजार लिटर पुरवलं जातं.


अहमदनगरला शेतकऱ्यांच्या संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे नगरमधील दिवसाचं 20 लाख लिटर दूध संकलन ठप्प झालं आहे.

बळीराजाच्या संपामुळे शहरातील जनता गॅसवर

दुसरीकडे शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी

  • शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा

  • शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा


मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.