मनमाड : नाशिक जिल्ह्यातील येवल्यात पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात एक जखमी झाला आहे, तर दगडफेकीत चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. आज येवल्याजवळील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ सकाळपासून शेतमालाच्या गाड्या अडवून त्यातील तांदूळ गहू हरभरा हा माल रस्त्यावर फेकला जात होता. दुपारनंतरही हा प्रकार सुरुच राहिला. हा सर्व प्रकार करणारे स्वत:ला शेतकरी भासवून लूट करत होते.
पोलिसांनी लूट करणाऱ्यांना आटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे.
दरम्यान सकाळपासून बंद असलेला मनमाड येवला मार्ग बंद होता. संध्याकाळी उशिरा हा रस्ता सुरु करण्यात आला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र अजून अवजड वाहनं सोडली जात नाहीत. मनमाड ते येवला किंवा कोपरगावपर्यंतच्या ढाब्यावर शेतमालानं भरलेले ट्रक थांबवण्यात आले आहेत.
या टोलनाक्यावर सकाळपासून रस्त्यांवर लूट करुन शेतमालाचं नुकसान करण्यात आलं आहे, तर शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे.