मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून दाखवलं आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लोगोवरच आता ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्यात आले आहे. शिवाय, शिवशाही या नवीन एसटी बसचं अनावरण देखील करण्यात आले.


एसटीचा नवीन लोगो

एसटीच्या लोगोमध्ये बदल करण्यात आले आहे. मूळ लोगोच्या खाली ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले असून, महाराष्ट्राच्या नकाशाचाही या लोगोत समावेश करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात सौर ऊर्जा पॅनलच्या उद्घाटनावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिणार असल्याचे सांगतिले होते. तसा आदेश लवकरात लवकर काढणार असल्याचेही ते म्हणाले होते. अखेर दिवाकर रावतेंनी एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून दाखवलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधींची पदं रद्द करण्यात येतील, असे कर्नाटकचे  नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीला दिवाकर रावते यांनी कडाडून विरोध केला होता. शिवाय, ते बेळगावला जात असताना पोलिसांनीही त्यांना रोखले होते. या सर्व पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनी एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून एका वेगळ्या प्रकारे उत्तर दिले आहे.