अयोध्या : राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्या अवघे काही तास उरलेत. हा भव्य दिव्य असा सोहळा अनुभवण्याासाठी लाखो लोक अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. सध्या प्राण प्रतिष्ठापनेचे विधी दररोज सुरु आहेत. वेगवेगळे अधिवास सुरु आहेत. त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे 22 जानेवारीचा दिवस आहे. अनिल मिश्रा यांनी मुख्य यजमान म्हणून सर्व विधी केलेत. सर्व कार्यक्रम धर्मशास्त्रानुसार होत असून काशीच्या विद्वानांनी हा मुहूर्त काढलाय. या मुहूर्तामध्ये कोणताही दोष नाही. लोक माहिती न घेता आरोप करत असल्याचं मिलिंद परांदे (Milind Parande) विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री यांनी म्हटलं आहे.
जिथे जन्मभूमीचं मंदिर होतं, तिथेच आता भव्य मंदिर उभारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही जमीन दिली गेलीये. त्यामुळे मंदिर मूळ जागी होत नाही असा आरोप करणाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याचा खटला दाखल झाला पाहिजे. जागा बदलली गेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू समाजाला जी जागा सोपवली होती तिथेच राम मंदिर उभारलं जातंय, असं देखील मिलिंद परांदे म्हणालेत.
राम मंदिर सोहळ्याचं कोणाला निमंत्रण?
राम मंदिर सोहळ्याला हजारो महानुभाव उपस्थित राहणार आहेत. तसेच दीडशे वेगवेगळ्या पंथांचे साधुसंत इथे येतील. सेवानिवृत्त सरन्यायाधीश, सैन्याचे सेवानिवृत्त जनरल्स तसेच 50 देशातून प्रमुख हिंदू नेते या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. रामचंद्रभूमी तीर्थक्षेत्र न्यासने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहेत. सर्व पक्षाच्या अध्यक्षांना बोलावलंय. काही पक्षांनी आम्हाला वेळ नाही म्हणून सांगितलं तर काहींनी आम्ही नंतर येऊ असं म्हटलं. काहींनी तर निमंत्रणच स्विकारलं नाही. तसेच त्यांनी काही राजकीय आरोप देखील केल्याचं यावेळी मिलिंद परांदे यांनी म्हटलं.
ही त्यांच्या कर्माची फळं - मिलिंद परांदे
मंदिरासाठी आंदोलन सुरु करताना आम्ही सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मागितला होता. ज्या राजकीय पक्षाने सुरुवातीपासून राम जन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांना आज त्यांचं फळ मिळत हे. ज्यांनी रामासाठी काम केलं आज त्यांना त्याचा लाभ मिळतोय. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळावे यासाठी लोक प्रयत्न करत होते. मात्र निमंत्रण मिळून सुद्धा जे इथे येत नाहीयेत, ती त्यांच्या कर्माची फळं आहेत आणि त्यांचं कमनशिब, असं म्हणत मिलिंद परांदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडेल. त्यानंतर सर्वांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल. आलेले इतर मान्यवर रात्रीपर्यंत हे दर्शन घेऊ शकतील. सामान्य लोकांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दर्शन सुरु होईल. गर्भगृह पूर्ण झालं आहे. त्याला छत आणि दारही आहे. त्यामुळे तिथे शास्रोक्त पद्धतीने प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलीये. जगातील कोणत्याही मंदिराच्या स्थापनेसाठी एवढे विमान आले नसतील, तेवढे चार्टर्ड फ्लाइट्स अयोध्येत येतील. भारतात पाच लाख पेक्षा जास्त मंदिरांमध्ये त्याच वेळेस प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहिला जाईल, सोबत धार्मिक कार्यक्रम पार पडतील. जवळपास 60 देशांमध्ये हा सोहळा लाईव्ह स्ट्रीमिंग होईल, अशी माहिती देखील मिलिंद परांदे यांनी दिली.
हेही वाचा :
राम मंदिर आणि 'ती' 500 वर्ष, आतापर्यंत नेमकं काय झाले? वाचा एका क्लिकवर....