MHT CET 2023: बारावी बोर्ड परीक्षेनंतर शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी (MHT CET 2023) परीक्षेचा निकाल 12 जून रोजी लागणार आहे. निकाल जरी 12 जून रोजी लागणार असली तरी त्याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सीईटी सेलकडून सुरु करण्यात येईल.
सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील, असं सीईटी सेलकडून सांगण्यात आलं आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं, त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केलं जात आहे. यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.
एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत
राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.
निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष
राज्य मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेध लागले आहेत. यंदा 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy), कृषी अभ्यासक्रमांच्या (Agriculture) प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.
MHT CET 2023: परीक्षा कशासाठी घेतली जाते?
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलमार्फत ही परीक्षा घेतली जाते.अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात.
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI