मुंबई : सोडत प्रक्रिये पश्चात आता म्हाडाच्या (mhada) सर्व प्रक्रिया या ऑनलाइन (Online) माध्यमातून होणार आहेत. संगणकीय सोडतीतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करता यावा या करिता प्रक्रिया देखील म्हाडाकडून सुरु करण्यात आलीये. याकरिता मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या 4082 सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील यशस्वी पात्र अर्जदारांपैकी 100 टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत. तसेच म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा यशस्वी पात्र अर्जदारांना ताबा पत्र देण्यास सुरुवात झालीये. आतापर्यंत 150 पात्र यशस्वी अर्जदारांना ताबा पत्र देण्यात आलाय.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील सदनिकांची संगणकीय सोडत करण्यात आली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 4,082 सदनिकांच्या विक्रीकरिता 1,20, 244 अर्जांची सोडत ही 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आली. ही सोडत संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे काढण्यात आली. या नव्या प्रणालीनुसार, अर्ज नोंदणीकरण आणि पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले.
'या' प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण
मंडळातर्फे सोडत पश्चात प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली. यानुसार यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविणे, तात्पुरते देकार पत्र पाठविणे, अर्जदाराने 25 टक्के विक्री किंमतीचा भरणा करण्याचे पत्र, 75 टक्के रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, वितरण आदेश देणे (मुद्रांक शुल्काचा भरणा करणे, दस्त नोंदवणे), ताबा पत्र देणे, ताबा पत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या सर्व प्रक्रिया प्रणालीमार्फत ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत सर्व पत्र संबंधित अर्जदारांना संबंधित अधिकार्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने केली जाते. यामुळे बनावट, खोटी कागदपत्र बनविणार्यांना चाप बसवण्यास मदत होईल.
क्यूआर कोडची सुविधा
या सर्व पत्रांवर क्युआर कोड टाकण्यात आलाय. या क्यूआर कोडद्वारे कागदपत्रांची सत्यता क्षणार्धात तपासण्यास येईल. क्यूआर कोडमुळे कागदपत्रांची दुय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार देखील टाळता येणार आहेत. आतापर्यंत सोडतीतील पात्र ठरलेल्या यशस्वी अर्जदारांपैकी सुमारे 550 अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किंमतीचा 100 टक्के भरणा केलाय. यामधील पात्र 150 अर्जदारांनी प्राप्त सदनिकेची 100 टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत.
ना - हरकत प्रमाणपत्र वितरित
सोडतीतील यशस्वी अर्जदारांना वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेण्यासाठील आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मंडळातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र अर्जदारांनी मागणी केल्यानुसार 24 तासांत ऑनलाइन वितरित करण्यात आले. दरम्यान सोडतीतील विजेत्या अर्जदारांना सदनिकेचा ताबा लवकर मिळावा यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाढीव काम करीत आहेत.