मुंबई :  राज्यातील प्रदूषणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. बीएमसी आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सीएम शिंदे यांनी बीएमसी आणि पोलीस प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी मुंबईत फक्त 7 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी असेल.


यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहणार आहे. मुंबई कोर्टाने दिलेल्या 4 दिवसांच्या कालावधीत आतापर्यंत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 170 वरून 133 वर आला आहे. चार दिवसांनंतरही प्रदूषण सामान्य झाले नाही, तर ज्या इमारतींनी एकही नियम पाळला नाही, अशा इमारतींवर कारवाई करून काम बंद केले जाईल. सर्व बांधकामे थांबवली जाणार नाहीत, फक्त नियमांचे पालन न करणाऱ्या इमारतींचे बांधकाम थांबवले जाईल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. 


बीएमसी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की,  प्रदूषणाची समस्या आता प्रत्येकाची समस्या आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेची कृती ही प्रत्येकाची कृती योजना असावी. लोकांनी मिळून हवेचा दर्जा चांगल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?


बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत.  रस्त्यावर असेलेली धूळ, बांधकामांमुळे असलेली धूळ, माती रस्त्यावर दिसता कामा नये. हजार टँकरच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुवावेत अशी सूचना दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहरी भागातही झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्व पातळीवरच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल. आवश्यकता भासल्यास कृत्रिम पाऊसही पाडला जाईल. मात्र, त्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.   एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देशही देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 


Cm Eknath Shinde On Air Pollution : प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे