मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित ऑनलाइन संगणकीय सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा व MHADA HOUSING LOTTERY SYSTEM या अॅपचाच वापर करावा, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे आज आयोजित लाईव्ह वेबिनारमध्ये करण्यात आले.  
       

  
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी दि. 09 ऑगस्ट 2024 पासून म्हाडाचे संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. म्हाडाच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याबाबत मार्गदर्शनासाठी व इच्छुक अर्जदारांच्या शंका निरसनासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे आज आयोजित ऑनलाइन वेबिनार उत्साहात पार पडला. या वेबिनारमध्ये 'म्हाडा'चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले यांनी सोडत अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली व इच्छुक अर्जदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.          
          
यावेळी श्रीमती बोडके म्हणाल्या की, म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त ही सोडत प्रक्रिया मानवी हस्तक्षेपविरहीत असून सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित आहे. 


मोबाईल नंबर आधार लिंक असावा


यावेळी श्रीमती बोडके यांनी अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती, अनामत रकमेचा भरणा करणे या प्रक्रियेबाबत सादरीकरणासह माहिती दिली. अर्ज नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. नोंदणी करतेवेळी अर्जदाराला digilocker या अॅपमध्ये स्वतःसह पती/पत्नीचे आधार व पॅन कार्ड अपलोड करून ते लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे म्हाडाला पडताळणी केलेली कागदपत्रे मिळणार आहेत. 


अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? 


अर्जदाराने दि. 1  जानेवारी 2018 रोजी नंतर जारी केलेले व बार कोड असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक असल्याचे श्रीमती बोडके यांनी सांगितले. MHADA HOUSING LOTTERY SYSTEM हे अॅप अद्ययावत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.        
          
गायकवाड म्हणाले की, अर्ज भरतेवेळी विवाहित अर्जदारांनी विहित ठिकाणी विवाहित म्हणूनच नमूद करणे गरजेचे असून तसे न केल्यास व निदर्शनास आल्यास सोडतीत विजेती सदनिका नाकारण्यात येऊ शकते. घटस्फोटीत अर्जदारांना सदनिका ताब्यात देतेवेळी डिग्री सादर करावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सदर प्रमाणपत्र अर्जदारास सादर करावे लागणार आहे.


उत्पन्न किती असावं?


प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उपलब्ध घरांसाठी अर्ज करण्याकरिता योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी नसल्यास विजेत्या अर्जदारास सोडत पश्चात नोंदणी म्हाडा करून देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे तसेच पती-पत्नी यांच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसणे गरजेचे असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.


आयकर विवरण पत्र कसं असावं?  


अर्ज करतेवेळी उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 चे आयकर विवरण पत्र सादर करणे गरजेचे असून यावर्षी सोडत प्रणालीत अर्जदाराने त्याचा आयकर खात्याचा पासवर्ड देणे आवश्यक आहे. तसेच आयकर खात्याला Two step verification लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले. अर्जदाराने एकूण उत्पन्न नमूद करताना आयकर विवरण पत्रातील एकूण उत्पन्न रक्कम नमूद करण्याची सूचना गायकवाड यांनी केली. म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहितीपुस्तिका बारकाईने वाचण्याचे आवाहनही त्यांनी केले. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in काही नेहमी विचारल्या जाणार्‍या संभाव्य प्रश्नांची उत्तरे टाकली आहेत, त्याचेही अवलोकन करण्याचे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले.   
         
म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज @mhadaofficial वरून या वेबिनारचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सदर प्रक्षेपण सुमारे 4500 नागरिकांनी लाईव्ह बघितले.