मुंबई: बहुचर्चित असणाऱ्या शिवस्मारकाचं बांधकाम आजपासून सुरु होणार आहे. आज दुपारी 3 वाजता शिवस्मारकाच्या पायाभरणीचं काम सुरु होणार आहे. एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून आज प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात ३ वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. आघाडीच्या सरकारच्या काळात हे स्मारक घोषित झाले. या स्मारकासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या दोन वर्षांत मिळाल्या. तसेच या स्मारकाचे जलपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अरबी समुद्रात १५ हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे अडीच हजार कोटी रुपये निश्चित केला आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागतिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात एल अॅन्ड टी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यानी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात एल अॅन्ड टी या कंपनीची निविदा ही सर्वात कमी किमतीची असल्यामुळे या कंपनीला स्मारक उभारण्याचे काम सोपविले आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३ हजार ८२६ कोटी रुपयांची निविदा दिली आहे.
या शिवस्मारकात काय असणार?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. या स्मारकातील मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे. स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे. स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.
अखेर शिवस्मारकाची पायाभरणी, आजपासून प्रत्यक्ष काम सुरू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2018 08:33 AM (IST)
एल अँड टी कंपनीकडून आज प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात ३ वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -