जालना : उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांना आपल्या वडिलांचं स्मारक पाच वर्षात बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार? अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
अजित पवार जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. "मुंबई महानगर पालिका ताब्यात असताना, सरकारमध्ये असताना पाच वर्षात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक ज्यांना बांधता येत नाही ते आम्हाला शिकवतात", अशी टीका अजित पवारांनी उद्धवे ठाकरेंवर केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. भाजप राम मंदिरासाठी आग्रही असताना शिवसेनेनंही हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती.
उद्धव ठाकरे आज बीड, लातूर आणि औरंगाबाद दोऱ्यावर होते. त्याठिकाणीही उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबरच्या नियोजित राम जन्मभूमी अयोध्या दौऱ्यासंदर्भात चर्चा झाली..