पुणे : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीतील सराईत गुंड अजय सुभाष चक्रनारायण (23) आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर मोहिउद्दीन शेख (26) या दोघांना पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडील दोन पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


दोन्ही गुंड कोथरुडमधल्या पौड रोडवरील साई पॅलेस बारजवळ संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली.

अजय चक्रनारायण हा राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. तसेच छोटा राजन टोळीशी संबंधित महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना कोथरुड विभागचा तो अध्यक्षदेखील आहे. तर जमीर शेख हा गजा मारणे टोळीतील सदस्य असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

या दोघांवरही कोथरुड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे कशासाठी जवळ बाळगली होती? आणखी काही शस्त्रसाठा त्यांच्याजवळ आहे का? त्यांनी काही शस्त्रास्त्रे विकली आहेत का? त्यांचे इतर साथीदार कोण? यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.

आज या दोन्ही गुंडांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही 16 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश ए. एस. मतकर यांनी दिले आहेत.