मुंबई : पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेशावेळी जो गोंधळ झाला अगदी तसाच गोंधळ आता एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण नाही. तसेच एक नोव्हेंबर 2018 ला MBBS UG चे notification काढण्यात आले होते. त्यामुळे 30 नोव्हेंबरला लागू झालेले मराठा आरक्षण एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी लागू होणार नाही.

दरम्यान एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेश प्रक्रियेवेळीदेखील पदव्युत्तर मेडिकल प्रवेशाप्रमाणे घोळ होऊ नये याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन यांनी सांगितले.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना जो फटका बसला तसाच फटका बारावीनंतर मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाजो न्याय सुप्रीम कोर्टाने यंदा मराठा आरक्षण नाकारताना लावला आहे तोच न्याय नीट प्रवेश परीक्षेच्या बाबतीतही लागू होतो.

महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाबद्दल जो जीआर आहे त्यात असे म्हटले आहे की, ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षण लागू होण्याआधीच सुरू झाली आहे त्यांना यंदा हे आरक्षण लागू होणार नाही.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 2 नोव्हेंबर 2018 ला सुरु झाली होती. तर मराठा आरक्षण 30 नोव्हेंबरला लागू झाले. याचाच आधार घेत काही विरोधी याचिका कोर्टात दाखल झाल्या आणि यंदा मराठा आरक्षण नाकारले गेले. त्याचप्रमाणे NEET ची प्रवेश प्रक्रिया ही एक नोव्हेंबरलाच सुरू झाली होती. त्यामुळे नीट प्रवेश प्रक्रियेतही मराठा आरक्षण लागू होणार नाही.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 972 जागांपैकी 213 जागांवर मराठा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. आता बारावीनंतरच्या मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत ही संख्या कितीतरी पटींनी जास्त असणार आहे.