सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील  82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मिरज वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या प्रकरणची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देशमुख यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच यास जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.


वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच कोरोनाची लागण झाली तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार असा प्रश्न अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे विचारणा केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वॅब ओमायक्रॉन तपासणीसाठी पुणे आणि दिल्लीतील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या रिपोर्टकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत. कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचनाही मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.


दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्य सरकारने काही निर्बंध लावले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. आज 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बाातम्या: