नागपूर : एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या ज्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे.  मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या असेही देशमुख म्हणाले.


 राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.


कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात सोयी वाढवल्या, शेकडो खाटा असलेल्या कोविड केअर सेंटर उभारले. ऑक्सिजनयुक्त खाटाही वाढवल्या त्यामुळे आता महाराष्ट्रात हळू हळू स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याच प्रमाणे नागपुरात ही स्थिती हळू हळू सुधारत दावा देशमुख यांनी केला. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे, परदेशातून लस आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. हे कोरोना विरोधातल्या लढाईत महत्वाचे आहे असे अमित देशमुख म्हणाले. 


कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारवीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


दहावीच्या परीक्षा रद्द


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचललं. दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.


कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE परीक्षा रद्द


कोरोना व्हायरसाचा वाढता प्रादुर्भाव पाहता JEE (मेन्स) ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा  27, 28 आणि 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसी (NIA)ने दिलेल्या माहितीनुसार, जेईई परीक्षांच्या नव्या तारखेची घोषणा परीक्षेच्या कमीत कमी 15 दिवसांआधी करण्यात येईल.