रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारे ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील तीन तरूणांनी सुरू केलेला हा प्रकल्प जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसाठी खर्‍या अर्थाने प्राण देणारा ठरला आहे. विविध प्रकारच्या उद्योगात ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी ऑक्सिजन वापरले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांची गरज ओळखून आवाशी येथील सतीश आंब्रे, शेल्डी येथील सचिन आंब्रे आणि लोटेतील सचिन चाळके या तिघा तरूणांनी जानेवारी 2020 मध्ये लोटे एमआयडीसीत ऑक्सिजन निर्मितीचा क्रायो गॅस हा प्रकल्प उभारला. हे तिघे तरूण पूर्वी लोटेतील एका कंपनीत कामाला होते. उद्योजकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. बँकेचे कर्ज आणि स्वत: गुंतवणुकीचे नियोजन करून तीन कोटीचा गॅस निर्मितीचा प्रकल्प त्यांनी लोटे एमआयडीसीत सुरू केला.


लोटेतील कारखानदार आणि जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना ते ऑक्सिजनचा पुरवठा करत होते. सुरवातीला शासकीय रूग्णालयाना फार कमी प्रामाणात ऑक्सिजन लागत होते. त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर या कंपनीचा भर होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शासकीय रूग्णालयात बेड आणि ऑक्सिजन कमी पडू लागले. त्यानंतर या कंपनीने उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्याचे बंद केले.


दिवसा दहा टन ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू झाला.ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारे लिक्वीड पूर्वीच्या कंपनीने बंद केल्यामुळे मध्यंतरी या कंपनीतून फार कमी प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन होत होते. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिंदाल कंपनीकडून लिक्वीड उपलब्ध करून दिले त्यामुळे क्रायो गॅस कंपनीतून आता दिवसा 8 ते 10 टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जात आहे. रत्नागिरी येथील ग्रामीण रूग्णालय, चिपळूणातील कामथे उपजिल्हा रूग्णालय, खेड येथील कळंबणी उपजिल्हा रूग्णालय, दापोली, गुहागर सह जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांना या कंपनीतून आता ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. 


कारखानदारांची गरज लक्षात घेऊन आम्ही क्रायोगॅस ही ऑक्सिजन निर्मिती करणारी कंपनी सुरू केली होती. कोरोनाची लाट येईल आणि जिल्ह्यातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी आमच्या कंपनीतील ऑक्सिजनचा वापर होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. कोविडची लस घेऊनही विश्रांती करता आली नाही. स्वतः ऑक्सिजनचे छोटे मोठे टँक भरून जिल्ह्यात पाठवण्याचे काम आम्ही तिघे करत आहोत, असं सतीश आंब्रे यांनी सांगितलं. 


ऑक्सिजन श्‍वासावाटे आत घेतला जातो. तो फुफ्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहचतो. तिथे ग्लुकोजसोबत त्याची प्रक्रिया होते. कोरोना किंवा अन्य संसर्गजन्य आजारात सुक्ष्म जीवाचा संसर्ग फुफ्फुसात वाढला तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशावेळी नेहमीसारखा श्‍वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही म्हणून रूग्णांना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.