मुंबई : महापौर पदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. एकीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे मुंबईला शिवसेनेचा महापौर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून आपलं वर्चस्व मुंबई महानगर पालिकेवर टिकवून ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही नियुक्ती झाल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. अनिल परब यांच्या उपस्थितीतच किशोरी पेडणेकर यांचा महापौरपदाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईसोबतच इतरही ठिकाणी महापौरपदाच्या निवडणूका पार पडल्या असून जाणून घेऊया कोणत्या महापौरपदी कोणत्या पक्षाचा महापौर विराजमान झाला आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपचा महापौर
पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली आहे. या निवडणुकीत मोहोळ यांना 99 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे प्रकाश कदम यांना 60 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. तर मनसे तटस्थ होती.
नाशिक महानगरपालिकेतील सत्ता भाजपने राखली
राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा येऊनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र नाशिक महानगरपालिकेची सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. नाशिक महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून भाजपचे सतीश कुलकर्णी महापौरपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणूकीआधी भाजप सत्ता राखू शकेल की नाही? अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण भाजपने निवडणूक बिनविरोध जिंकून आपली सत्ता राखली आहे.
परभणीत काँग्रेसने राखला गड, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
परभणीत आज महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही लढत भाजपच्या मंगल मुदगलकर विरुद्ध काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांच्यात झाली. परंतु, निवडणूकीत भाजप एकाकी पडल्याचे दिसून आले. भाजपच्या मंगला मुदगलकर यांना केवळ 8 मते पडली. दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बुहुमतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर कॉंग्रेस चे भगवान वाघमारे उपमहापौरपदी विराजमान झाले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता
पिंपरी चिंचवड महापौर पदी उषा उर्फ माई ढोरे यांची 81 मतांनी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा 40 मतांनी पराभव करत त्या महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राज्यातील सत्तेआधीच महाविकासआघाडी पहायला मिळाली. पण तरिसुद्धा भाजपने महापौरपदाचा मान पटकावला.
या निवडणूकीसाठी मनसेचे एकमेव नगरसेवक मात्र गैरहजर होते. पिंपरी चिंचवड उपमहापौर पदी भाजपच्या तुषार हिंगेची बिनविरोध निवड झाली. महापौर पदासाठी मतदान झाल्यानंतर उपमहापौर पदाच्या मतदानापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक माघार घेतली. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. नगरसेवक राजू बनसोडे राष्ट्रवादी कडून उभे होते. बनसोडेंनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे तुषार हिंगे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
चंद्रपुरात भाजपला मिळाली शिवसेनेची साथ, शिवसेनेला सोबत ठेवण्यात सुधीर मुनगंटीवार यांना यश
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपला मतदान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. राज्यात जरी भाजप सेनेची युती तुटली असली तरी चंद्रपुरात मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे शिवसेनेच्या नगरसेवकांना आपल्या सोबत ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक विशाल निंबाळकर आणि सुरेश पचारे यांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. भाजपला महापौर आणि उमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतच मनसेच्या 2 आणि 2 अपक्ष नगरसेवकांची देखील मदत झाली. पक्षाकडून कुठलाच आदेश न आल्यामुळे आम्ही स्थानिय पातळीवरच्या राजकारणाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे शिवसेना नगरसेवकांनी म्हटलं आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची महापौरपदी निवड झाली आहे. कचर्लावार यांना 42 मतं तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मतं पडली. त्यामुळे महापौरपदी विराजमान होण्याचा मान भाजपला मिळाला. तसेच अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणूकीत भाजपचे चेतन गावंडे विजयी झाले आहेत. त्यांना 49 मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात एमआयएमचे उमेदवार अफजल हुसेन मुबारक हुसेन हे उभे होते. त्यांना 21 मतं मिळाली आहेत.
लातूर महानगरपालिकेत सत्ताबदल... काँग्रेसला दिली भाजपतील एका गटाने साथ
लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षानंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत.काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत लातूर महापालिकेचे महापौरपद काबीज केले आहे. ते लातूरचे नवे महापौर असणार आहेत. भाजपचे 35 नगरसेवक, काँग्रेसचे 32 नगरसेवक आणि 1 वंचित बहुजन आघाडीचे असताना काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले आहे. यातील 68 मतांपैकी 35 मते काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली आहेत. भाजपतील चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या 2 नगरसेवकांनी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे यांच्या बाजूने मतदान केले अन् भाजपतील गटबाजी उघड झाली. उपमहापौरपदासाठी चंद्रकांत बिराजदार यांना काँग्रेसने साथ दिली. परिणामी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार शैलेश गोजमगुंडे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार भाग्यश्री कौलखैरे यांचा पराभव झाला. भाजपातील संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यातील गटबाजीचा अचूक फायदा काँग्रेसने घेतला आहे.
अकोला महानगरपालिका
अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसनेंची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या अजरा नसरीन यांचा केला 48 विरूद्ध 13 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे राजेंद्र गिरी हे विराजमान होणार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पराग कांबळेंचा 48 विरूद्ध 13 मतांनी केला पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ असल्याचे पाहायला मिळाले, तर राष्ट्रवादी, वंचित, एमआयएमचे 10 नगरसेवक मतदानाला अनुपस्थित होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापौर निवडणूक : कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2019 01:10 PM (IST)
महापौर पदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -