मुंबई : पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला राज्यातल्या जनतेची पसंती आहे, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्याबाबत विचारलं असता, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनाव, अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव पुढे केलं आहे. परंतु शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची नावं चर्चेत आहेत. आज होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

संजय राऊत म्हणाले की, "पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, शिवसेनेने अत्यंत स्वाभिमानाने घेतलेला हा निर्णय आहे. राज्यातील जनतेची इच्छा आहे आणि लाखो शिवसैनिकांची इच्छा आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं."


...आता इंद्रपदही नको
भाजपकडून शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आल्याचं दैनिक लोकसत्ताचं वृत्त संजय राऊत यांनी फेटाळलं आहे. शिवसेनेने स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्रीपद आणलं आहे. त्यामुळे आता कोणी मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिलं तरी नको असं संजय राऊत म्हणाले.

भाजपविरोधात संजय राऊतांचा एकहाती लढा
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट असो वा काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी चर्चा, सगळीकडे संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली. विशेष म्हणजे विरोधक असूनही राऊतांनी शरद पवारांचा विश्वास कमावला. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी पवारांची राऊतांना पसंती असल्याचं कळतं.

मुख्यमंत्रीपद शिवसेनेला, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याचं कळतं. यानुसार, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळेल.

संबंधित बातम्या

शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 15, काँग्रेसला 12 खाती; ठाकरे-पवार चर्चेत फॉर्म्युला


सत्तास्थापनेपूर्वी पवार-ठाकरेंमध्ये खलबतं, रात्री उशिरा एक तास बैठक, बैठकीनंतर संजय राऊतांचे सकारात्मक संकेत