31 ते 40 वयोगटातील लोकांना जास्त होतोय कोरोना! काय आहे कारण?
जे नागरिक 31 ते 40 वयोगटातील असतील तर त्यांनी काळजी करण्याचे कारण आहे. ह्या वयोगटातील नागरिकांना राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्यने साडे पंधरा लाखाचा आकडा पार केला असून मृतांचा आकडा 41 हजार 965 इतका आहे. यामध्ये विशेष म्हणजे जे नागरिक 31 ते 40 वयोगटातील असतील तर त्यांनी काळजी करण्याचे कारण आहे. ह्या वयोगटातील नागरिकांना राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. या अहवालात राज्यात जे कुणी या संसर्गजन्य आजारापासून बाधित आहे त्याच्या वयानुसार, लिंगानुसार, आधीच्या व्याधी काही असतील तर त्याचा अहवाल बनविला जात असतो. त्यामध्ये 31 ते 40 या वयोगटातील व्यक्तींना कोरोना मोठ्या संख्येने होत असल्याचे समोर आले आहे. तर 101 ते 110 वयोगटातील आतापर्यंत केवळ 7 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागच्या रविवारी सादर केलेल्या अहवालानुसार त्यांनी 15 लाख 78 हजार 332 रुग्णांचा आकडा धरून हा अहवाल सादर केला आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण 31 ते 40 वयोगटातील असून त्यांची संख्या 3 लाख 35 हजार 765 इतकी असून ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल 41 ते 50 वयोगटातील रुग्ण असून त्यांची संख्या 2 लाख 82 हजार 311 इतकी आहे, तर 21 ते 30 वयोगटातील रुग्ण संख्या 2 लाख 66 हजार 470 इतकी आहे तर 51 ते 60 वयोगटातील रुग्णसंख्या 2 लाख 52 हजार 492 इतकी आहे. 61 ते 71 वयोगटातील रुग्णसंख्या 1 लाख 69 हजार 860 इतकी आहे. त्याचप्रमाणे 11 ते 20 वयोगटातील रुग्णसंख्या 1 लाख 07 हजार 711 इतकी आहे. 71 ते 80 वयोगटातील रुग्णसंख्या 80 हजार 644 इतकी असून 81 ते 90 वयोगटातील रुग्णसंख्या 22 हजार 703 इतकी आहे. 91 ते 100 या वयोगटातील रुग्णसंख्या 2 हजार 878 इतकी आहे तर 101 ते 110 वयोगटातील रुग्णसंख्या 7 इतकी आहे. या सगळ्यात विशेष म्हणजे दहावर्षापर्यंतच्या वयोगटातील रुग्णसंख्या 57 हजार 491 इतकी आहे.
कोविड सेंटरमधील आरोग्य सेविकांचा अनोखा 'दुर्गावतार', चंदगडमधील उपक्रमाचे कौतुक
राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात कि, "खरं तर काळजी सर्वच वयोगटातील लोकांनी घेणे गरजेचे आहे. मात्र, राजयात जे सध्या 31 ते 40 वयोगटातील बाधितांचे प्रमाण आढळून येत आहे, त्याला एक मुख्य कारण म्हणजे या वयोगातील जास्त लोक नोकरी, कामा-धंद्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांचा सामाजिक वावर जास्त अनेक लोकांच्या संपर्कात ते येत असावेत. अशावेळी शासनाने सुरक्षिततेचे जे काही नियम आखून दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे."
राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी राज्य प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे मोठे प्रयत्न केले जात आहे. मुंबई महापलिकची चेस द व्हायरस, तर संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. त्यांना जर त्यावेळी कुटुंबातील कुणा सदस्यांना कोणत्याही प्रक्राराची लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गेली 8 महिने राज्याची प्रशासन यंत्रणा या कोरोनाला पायबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे. शासकीय व्यवस्थेतील डॉक्टरांसोबत खासगी डॉक्टरांनी सुद्धा या काळात भरीव कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत 13 लाख 58 हजार 606 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर 1 लाख 85 हजार 207 रुग्ण विविध ठिकाणी राज्यात सध्या उपचार घेत आहेत.
दसऱ्यापासून राज्यात जिम सुरू होण्याची शक्यता, कशा प्रकारे व्यायाम होणार? कोणत्या गोष्टींना बंदी?