Nagpur Marbat Updates: कोरोना काळातील (Corona viras) दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा नागपुरातील (Nagpur News) मारबत उत्सव प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लाखोंची गर्दी रस्त्यांवर पिवळ्या आणि काळ्या मारबतीचे दर्शन घेताना दिसली. भ्रष्टाचारावर, नागपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईवर भाष्य करणाऱ्या बडग्यानी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 


ईडा पिडा, रोग राई, जादू टोना, संकटे घेऊन जा गे मारबत.... या जयघोषात आज नागपूरची गेले 142 वर्षांची मारबत उत्सवाची परंपरा पुन्हा एकदा नव्या जोशात पाहायला मिळाली. कोरोना संकटामुळे मारबतच्या भव्य मिरवणुकीवर मर्यादा आल्या होत्या. मात्र आज लाखो नागपूरकर कोरोनाचा संकट विसरून मोठ्या उत्साहाने पिवळ्या आणि काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. सकाळी 9 वाजता जागनाथ बुधवारी परिसरात पिवळ्या मारबतीची पूजा झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. नागपूरच्या मारबत उत्सवात महती सांगतानाच बावनकुळे यांनी जशी मारबत दरवर्षी नागपूरकरांची ईडा पिडा, रोगराई घेऊन जाते तशीच महाराष्ट्राची इडा पिडा नुकतच झालेल्या सत्तांतरातून दूर झाली आहे अशी कोपरखळी मारली. 


1881 पासून 142 वर्षांची अखंडित परंपरा


त्यानंतर काही वेळाने नेहरू चौक परिसरात काळ्या मारबतीची पूजा पार पडली आणि त्यानंतर दोन्ही मारबत आपापल्या मंडपातून बाहेर पडल्या. हजारोंच्या उपस्थितीत दोन्ही मिरवणुका नेहरू पुतळ्याजवळ एकत्रित आल्या.  नंतर दोघींच्या एकत्रित मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 1881 पासून 142 वर्षांची अखंडित परंपरा असलेली ही ऐतिहासिक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.. पिवळ्या आणि काळ्या मारबतीचे दर्शन घेतल्याने सर्व इडा पीडा, रोगराई, दुःख नाहीसे होतात अशी नागपूरकरांची भावना असल्याने अनेक लोकं आपल्या लहान मुलांना मारबतीच्या प्रतिमेला स्पर्शही घडवतात. 
 
मारबत उत्सवाचे पौराणिक महत्व काय?


भगवान श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी मामा कंसाने पुतना मावशीला पाठविले होते. तिने विषारी दूध पाजतानाच श्रीकृष्णाने पुतना राक्षसीनीचा वध केल्यानंतर तिच्या मृतदेहाची लोकांनी धिंड काढून घरातील टाकावू वस्तू आणि पळसाच्या झाडाच्या फांदीद्वारे (मेढे) 'रोगराई, ईडा पिडा घेऊन जाय गे मारबत, अशा घोषणा देत गावाबाहेर मृतदेह जाळला होता, अशी आख्यायिका आहे. मान्यता आहे की तेव्हापासूनच पोळ्याच्या पाडव्याच्या पहाटेस पुतना मावशीचे प्रतीक म्हणून मारबत काढण्यात येऊन गावाच्या वेशीबाहेर जाळावी. त्यामुळे सर्व ईडा पिडा रोगराई आणि अनिष्ट चालीरीती दूर होतात. 


पिवळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्त्व काय?


पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेली समाजाकडून 1885 साली जागनाथ बुधवारीमध्ये पिवळी मारबत उत्सवाला सुरुवात करण्यात आली. तेव्हा इंग्रजांच्या विरोधात अनेक मुद्द्यांना घेऊन लोकांना एकत्रित आणत या मारबतीची मिरवणूक काढली जायची. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या पिवळ्या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून अनिष्ट चालीरीती, इडा पीडा यावर भाष्य होऊ लागले. 


काळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्व काय? 
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांनी जनता त्रस्त झाली होती. त्यावेळी नागपूरकर जनता इंग्रजांविरोधात संघर्ष करत असताना भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.  या बाकाबाईचा निषेध करण्यासाठी 1881 पासून बाकाबाईचा पुतळा तयार करून काळी मारबत काढण्यात येते. इतवारी परिसरातील नेहरू पुतळ्यापासून या काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. 1942 मध्ये मारबतीच्या उत्सवाच्या काळात इतवारी परिसरात दंगल झाली होती. यावेळी 5 जण गोळीबारात ठार झाले होते. मात्र तरीही मारबतीची मिरवणूक काढण्यात आली होती. 


बडगे म्हणजे काय? 
मारबत उत्सवाचा एक मुख्य आकर्षण म्हणजे बडगे. बडगे म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावंवर टीका करणारे पुतळे. त्या त्या वर्षी समाजापुढे ज्या समस्या असतात. ज्या काही महत्वाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्दे आणि प्रश्न असतात. त्यावर समाजाच्या वतीने हे बडगे काढून टीका केली जाते. आजही राजकारण्यांचे भ्रष्टाचार, नागपूर मनपाचे भोंगळ कारभार आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढते दर आणि त्या संदर्भात नागरिकांच्या रोषावर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत होते. 


मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून जरी अनिष्ट चालीरिती, वाईट परंपरा आणि नकारात्मक गोष्टी शहरातून दूर व्हाव्यात अशी अपेक्षा असते तरी हल्ली अनेक तरुण या मिरवणूकीत मद्यपान करून सहभागी होतात. मात्र, यंदा बडगे काढणाऱ्या काही मंडळांनी पुढील वर्षीपासून कोणत्याही कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या काळात मद्यपान करू नये असे ठराव केले आहेत. तसे झाल्यास नागपूरच्या या ऐतिहासिक परंपरेला आणखी सकारात्मकता येईल.