Konkan Political Update :  भाजपचे आमदार (BJP MLA) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) सध्या कोकणच्या दौऱ्यावरती (Konkan Tour) आहेत. कालपासून त्यांनी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा दौरा करण्याचे नियोजन केलेले आहे. मुंबई गोवा हायवेची पाहणी करत त्याबाबत चव्हाण सध्या आढावा घेत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देखील करत आहेत. पण या दौरांमध्ये राजकीय चर्चा देखील अधिक होताना दिसत आहेत. कारण कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  तीन आमदार शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. पण त्यानंतर देखील स्थानिक पातळीवरील गळती रोखण्यास शिवसेनेला यश आल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात.

 

बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?

रवींद्र चव्हाण यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे उपनेते आणि लांजा - राजापूर  या विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. लांजा येथील शासकीय विश्रामगृहात वीस मिनिटे ते अर्धा तास बंद दाराआड चर्चा झालेली आहे. अर्थात या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहत असताना कोकणातील प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा झालेली असू शकते ही शक्यता देखील नाकारता येत नाही. रवींद्र चव्हाण देखील कोकणातील आहेत. मागील काही वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवाय इतर विकासात्मक कामदेखील असून त्यांची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला निश्चितच महत्त्व आहे. बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील किमान अद्याप तरी बाहेर आलेला नाही. पण रवींद्र चव्हाण आणि राजन साळवी  बाबत माहिती देऊ शकतात अशी शक्यता आहे.

 

 कोणत्या मुद्द्यांवर चर्चा असू शकते?

मागच्या काही दिवसातील राजकीय वातावरण पाहता, घडामोडी पाहता भेटीकडे दुर्लक्ष करून निश्चितच चालणार नाही. कोकणातील शिवसेनेचा बडा नेता शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहे, अशी देखील चर्चा मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोकणासह राज्यभरात झाली होती. त्यामध्ये राजन साळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधत बातम्या निराधार असल्याचं म्हटलं होते. पण असं असलं तरी कोणत्याही प्रकारची राजकीय शक्यता नाकारता येत नाही. त्याच वेळेला साळवी आणि चव्हाण यांच्या भेटीकडे राजकीय नजरेनं न पाहता ही भेट कोकणातील विकास कामांवर देखील झालेले असू शकते. तसेच रिफायनरीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. भाजप रिफायनरीसाठी आग्रही आहे. राजन साळवी यांची भूमिका देखील रिफायनरी व्हावी अशीच आहे. या भेटीमध्ये रिफायनरीबाबत देखील चर्चा झालेली असू शकते.

 

भास्कर जाधव यांनी केला होता चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास

रवींद्र चव्हाण यांनी काल परशुराम घाटाची पाहणी केली होती. त्यावेळी शिवसेनेचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास देखील केला होता. त्यावेळी जाधव यांना विचारले असता, आम्ही कोकणातील लोकप्रतिनिधी आहोत. कोकणातील समस्यांबाबत एकत्र येणं गरजेचं आहे. काकडे राजकीय दृष्टीने पाहता कामा नये. चव्हाण हे आमचे मित्र आहेत. सत्ताधाऱ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली असेल तर त्याचे आम्ही देखील स्वागतच करणार, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांकडून दिली होती.