मुंबई: एकीकडे राज्यात सातत्यानं पावासाच्या बातम्या येत असतानाच, काही जिल्ह्यात मात्र परिस्थिती चिंताजनक आहे.

 

मराठवाड्यात पावसानं जेमतेम सरासरी गाठली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे उभी पिकं करपयाला लागली आहेत. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग शुष्क पडला आहे.

 

दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांना पुन्हा एकदा दुष्काळाची दाहकता सहन करावी लागण्याची चिन्हं आहेत.

 

खरं तर पावसानं यंदा दमदार सुरुवात केली होती. जुलै महिन्यात अवघ्या महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. पण पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता, उर्वरित महाराष्ट्रात मात्र ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा ठाक पडला आहे. फक्त शेतीच्याच नाही, तर बीड, लातूरसारख्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे.  त्यामुळे विशेषतः मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट आहे.

 

महाराष्ट्रात विभागनिहाय पडलेला पाऊस

*हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार महाबळेश्वर तसंच कोयना परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे साताऱ्यात चक्क सरासरीच्या ५० टक्के जास्त पाऊस दिसतोय, नाशकात ३५ टक्के जास्त, सांगली, पुण्यात २८ टक्के तर रत्नागिरीत २४ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

 

*धुळ्यात सरासरीच्या २७ टक्के कमी पाऊस, नंदुरबारमधे २० टक्के कमी तर भंडाऱ्यात २९ टक्के कमी पाऊस झाला आहे.

*मध्य महाराष्ट्रात या काळात सरासरी 570.4 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात 643.4 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा  १३ टक्के जास्त पाऊस पडला.

*मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठली आहे. याकाळात 510.8 मिमी. पाऊस पडणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात 510.1 मिमी म्हणजे सरासरी इतका पाऊस पडला.

*विदर्भात सरासरी 776.7 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात  795.7 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा २ टक्के जास्त पाऊस पडला.

*कोकण आणि गोव्यात 2551.7 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात आत्तापर्यंत 2919.6 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 14 टक्के जास्त पाऊस पडला आहे.

 

ऑगस्ट महिना तुलनेनं कोरडा

*राज्यातील  21 तालुक्यात सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

*128 तालुक्यात सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे.

*83 तालुक्यात सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.

*38 तालुक्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

*83 तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे.

 

जून ते ऑगस्ट असा पडला पाऊस

*राज्यातील  00 तालुक्यात सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

*04 तालुक्यात सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे.

*72 तालुक्यात सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.

*132 तालुक्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

*145 तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे.

 

देशात जून-ऑगस्टमधील सरासरीच्या ३ टक्के कमी पाऊस पडला.

  • जून ते 30 ऑगस्ट या काळात देशात सरासरी 707.4 मिमी पाऊस पडतो, यंदा 2 मिमी म्हणजेच सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडलाय.


 

  • संपूर्ण महाराष्ट्रात या काळात 6 मिमी पाऊस पडतो, यंदा 892.6 मिमी म्हणजे सरासरीच्या ९ टक्के जास्त पाऊस पडलाय