Marathwada Rain Update : मराठवाड्यात सर्वदूर रिमझिम पावसामुळे पिकांना जीवनदान; मोठ्या पावसाची अपेक्षा कायम
Marathwada Rain Update : औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात कमी अधिक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Marathwada Rain Update: जून महिना कोरडा गेल्यावर आता जुलै महिन्याचा 15 तारखेनंतर मराठवाड्यात (Marathwada) पहिल्यांदाच सर्वदूर पाऊस (Rain) पाहायला मिळत आहे. मंगळवारी विभागातील अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे उशिरा का होईना पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर आज आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात कमी-अधिक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर रात्री देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असताना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.
हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर पाऊस झाला. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तर मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. तसेच दुपारी 1 वाजेपासून जिल्ह्यातील पावसाला प्रारंभ झाला, ज्यात हिंगोली शहरासह कळमनुरी, वरुड, डोंगरकडा, जवळापांचाळ, आखाडा बाळापूर, डिग्रस कन्हाळे, वारंगाफाटा, शिरडशहापूर, औंढा नागनाथ, कुरुदा, जवळा बाजार, कौठा आदी भागांमध्ये दुपारच्या वेळी रिमझिम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेले पाहावयास मिळाले. तर या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नांदेड : जिल्हाभरातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला असताना, जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तर अजूनही 31 टक्के पावसाची तूट आहे. मात्र दुबारपेरणीचं संकट टळले असून, शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. सोमवारी रात्रभर व मंगळवारी देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 205 मिमी पाऊस झाला असून, अजूनही 31 टक्के तूट कायम आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत सरासरी 15.10 मि.मी. पाऊस झाला आहे.
परभणी : दरम्यान परभणी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली, मंगळवारी सायंकाळपर्यंत विविध भागांमध्ये रिपरिप सुरु होती. शहर परिसरात सोमवारी सायंकाळी दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाला होता. मंगळवारी सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत 23.04 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर अजूनही दमदार पावसाची शक्यता आहे.
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत 195 मिमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 9.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. तर मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 88 टक्के पेरण्या झाल्या असून, सोयाबीनसह अन्य पिके चांगली आहेत. भिज पाऊस पडत असून वापसा नसल्याने पेरण्या काही भागांत थांबल्या आहेत. तर यापूर्वी केलेल्या पिकांना दोन दिवसातील पावसामुळे जीवनदान मिळाले आहे.
उस्मानाबाद : पुढील दोन-तीन दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. तर आज सरासरी 30 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर