Marathwada Water Crisis : राज्यात नुकत्याच पाचही टप्प्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. असे असतानाच दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागासह मराठवाडा दुहेरी संकटात सापडल्याचे भयाण चित्र आहे. एकीकडे पाणी टंचाई (Water Crisis) पाहायला मिळत असून, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) शेतकरी अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. त्यात मराठवाड्यातली (Marathwada) काही उदाहरण दुष्काळ आणि अवकाळीची दाहकता सांगायला पुरेशी आहेत.


एका दृश्यांमध्ये धडपड सुरू आहे ती घोटभर पाण्यासाठी, जनावरांचा जीव वाचवण्यासाठी, तर हंडाभर पाण्यासाठी मैलोंची पायपीट करून कोरड्या घशाची तहान भागवणासाठीची. दुसरे चित्र आहेत त्याच मराठवाड्यातील अस्मानी संकटाची. संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पपईबाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे. तर इतर शेतकऱ्यांच्या शेतपिकांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे अवकाळी आणि दुष्काळाच्या दृष्टचक्रात मराठवाडा अडकल्याचे चित्र आहे.  


मतदान केलं तुम्हाला, आता पाणी द्याल का आम्हाला?


मराठवाड्यातील गावागावात पाण्यासाठी अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी कुणी रात्र जागून काढतय, तर कोणी टँकरची वाट पाहत दिवस घालवतोय. हिंगोली जिल्ह्यात पाणी प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की, 81 ठिकाणी विहीर आणि बोरवेल्स अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी तर विहिरीतील पाणी काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळतय. त्यामुळे मतदान केलं तुम्हाला, आता पाणी द्याल का आम्हाला, अशी म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. हिंगोलीप्रमाणे जालना जिल्ह्यात देखील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. अनेक प्रकल्प कोरडेठाक पडल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.


8 जिल्ह्यातील जवळपास 700 हेक्टर पिकांचे नुकसान


मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना त्याच मराठवाड्यात अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात 23 छोटी मोठी जनावरे दगावली आहेत. तर विविध घटनामध्ये 23 लोकं जखमी, तर 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यात 8 जिल्ह्यातील जवळपास 700 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी आणि मराठवाड्यातील जनता सापडल्याचे बघायला मिळाले आहे. 


मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात


मराठवाड्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असताना दुसरीकडे नेत्यांचं मात्र या विषयी राजकारण सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. या विषयी बोलताना राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की राज्यात मुबलक चारा आहे. मात्र त्यांच्यापासून अवघ्या शंभर किलोमीटर दूरवर असलेल्या आणि त्यांच्याच पक्षातील आमदार असलेले प्रशांत बंब यांच्यावर जनावरांची छावणी सुरू करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आचारसंहिता शिथिल करत तात्काळ या विषयी मदत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मराठवाड्यातली टँकरची स्थिती



मराठवाड्यात असे एकूण आठ जिल्ह्यात आज 1803 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या