पुणे: पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली पोर्शे कार तब्बल 200 KMPH च्या वेगाने एका बाईकला धडकली होती. यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती. त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला होता. वेदांत अग्रवाल हा पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला होता. या सगळ्यामुळे सामान्य जनता संतापली होती. (Pune Crime News)
जनतेच्या रोषामुळे टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही कठोर आदेश
राज्याच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच पुणे अपघातप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते. पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
पोलिसांकडून कारवाईचा धडाका
पुणे पोलिसांनी सुरुवातीच्या काही तासांमध्ये या प्रकरणात अपेक्षित कामगिरी केली नसली तरी मंगळवारी पहाटेपासून पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले. तसेच वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना आता न्यायालयात हजर केले जाईल.
आणखी वाचा