Marathwada Liberation Day :  मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेली मंत्रीमंडळाची उपसमिती शिंदेसरकारने बरखास्त केली. त्यानंतर नवीन समिती अद्याप नेमलेली नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 75 कोटी रुपयांपैकी एक रुपयाही शिंदे सरकारने अद्याप वितरीत केलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा कसा होणार ?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.  मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दलची शिंदे सरकारची ही बेफिकिरी, अनास्था, तमाम स्वातंत्र्यसैनिक आणि मराठवाड्यातील जनतेचा अवमान करणारी, संतापजनक आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.


देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा झाला. 17सप्टेंबरपासून मराठवाडा-हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हैदराबाद येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होत असून तेलंगणा सरकारने राज्यपातळीवर भव्य नियोजन केले आहे. मात्र महाराष्ट्रात कुठलीच तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करण्याबाबत कमालीचे उदासीन, बेफिकीर असल्याचे दिसत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवासाठी 75 कोटींची तरतूद केली. महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, संदिपान भुमरे, शंकरराव गडाख आणि धनंजय मुंडे या मंत्र्यांची उपसमिती स्थापन केल्याचा शासननिर्णय  जारी करण्यात आला होता.  त्या समितीने अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाची रुपरेषाही तयार केली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्यात आली. मात्र नवीन समिती स्थापन करण्यात आली नाही. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतुद केलेल्या निधीपैकी एक रुपयाही दिला नाही. मराठवाड्यातून आलेल्या प्रस्तावालाही शिंदे सरकारने प्रतिसाद दिला नाही. शिंदे सरकारची ही बेफिकीरी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वीरांचा आणि मराठवाड्यातील जनतेच्या भावनांचा अवमान करणारी आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. 


आणखी वाचा -
दिल्लीच्या बादशहासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाच्या वेळेत बदल; दानवेंचा आरोप
Bahirji Shinde : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यवीर बहिर्जी शिंदेंच्या कुटुंबाची दयनीय अवस्था, पडक्या घरात राहण्याची वेळ