Kolhapur News : कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मी त्या ठिकाणी असतो, तर ठोकून काढलं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर रविकिरण इंगवले यांनीही जोरदार पलटवार केला आहे. राजेश क्षीरसागर म्हणजे सिंघममधील जयकांत शिकरे असल्याची बोचरी टीका केली आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रविकिरण इंगवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महिलेच्या खांद्यावरून बंदूक कशासाठी चालवत आहात? ठोकून काढणार होता, तर तिसऱ्या रांगेत कशासाठी बसला होता? पदराआडून राजकारण करू नये.
पेड कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला लागतात
राजेश क्षीरसागर यांनी पेड कार्यकर्त्यांकडून गुन्हा केल्याचे म्हटले होते. त्यामध्ये फिरंगाई तालमीचा एकही कार्यकर्ता नव्हता असेही म्हटले होते. यावरून रविकिरण इंगवले यांनी टोला लगावत पेड कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना लागतात, कोल्हापुरात शिवसेनेसाठी लागत नाहीत, असे म्हणाले. इंगवले पुढे म्हणाले की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्याच बूथवरून पूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण केलं आहे. मी दोषी असेन तर देश सोडून जाईन. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा
कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रकारावरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला, तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेश क्षीरसागर गटाच्या बूथ समोर मिरवणूक आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या