Aurangabad News: गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत 17  सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपस्थित राहता यावे यासाठी औरंगाबाद येथील मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 9 ऐवजी 7 वाजेची करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिक, जनतेचा अपमान असून आम्ही तो हाणून पाडू असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला. तर दिल्लीच्या बादशहासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाच्या वेळेत बदल करण्यात आल्याचा खोचक टोलाही दानवे यांनी लगावला आहे. 


औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतील बादशहाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे काम सुरू आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. तर दरवर्षी सकाळी नऊ वाजता सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाजवळ मराठवाडा मुक्ती संग्रामचा कार्यक्रम पार पडत असतो. गेल्या 75 वर्षांपासून हीच परंपरा आहे. मात्र, आता सकाळी नऊ वाजेच्या ऐवजी सकाळी 7 वाजता कार्यक्रम उरकण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत मंत्रालयीन स्तरावरून विभागीय आयुक्तांना आदेशही प्राप्त झाले आहेत. मात्र कार्यक्रमाची वेळ बदलली तर आम्ही शांत बसणार नाही, प्रशासनाचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा दानवे यांनी दिला आहे. 


कार्यक्रमाच्या वेळेवरून नवा वाद...


दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्ती संग्रामचा कार्यक्रम पार पडत असतो. मात्र उद्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजता होणार असल्याचे बोलले जात असून, त्याप्रकारे प्रशासनाकडून तयारी सुद्धा केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावरून नवीन वाद समोर येण्याची शक्यता आहे. 


यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण 


सरकारने पालकमंत्रीपदाची घोषणा केली नसल्याने उद्या होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  ज्यात औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर नांदेड जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस, हिंगोली जिल्ह्यात सुधीर मूनगंटीवार, लातूर जिल्ह्यात गुलाबराव पाटील, परभणीत अतुल सावे, बीड संदिपान भुमरे, उस्मानाबाद तानाजी सावंत आणि जालना जिल्ह्यात अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


तर ठरलं 'हे' मंत्री करणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने आठही जिल्ह्यात ध्वजारोहण


अजबच! कंत्राटदाराला मिळालेलं कंत्राट भुमरेंच्या जावयाला; थेट रजिस्ट्रीच करून घेतल्याचा दानवेंचा आरोप