हिंगोली : 15 ऑगस्ट 1947  रोजी भारत (India) देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु मराठवाडा (Marathwada) मात्र अजूनही रझाकारांच्या तावडीत होता.  या रझाकारांच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी त्यावेळी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी झुंज दिली. याच लढाईमध्ये स्वातंत्र्यवीर बहिर्जी शिंदे (Bahirji Shinde) यांना हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथे गोळी लागल्याने वीर मरण आले. मराठवाड्याच्या मुक्तिसाठी त्यांनी आपले प्राण दिले. परंतु, बहिर्जी शिंदे यांच्या वंशजांना सद्यस्थितीला राहण्यासाठी नीट घर देखील नाही. बहिर्जी यांच्या कुटुंबाची आज खूपच दयनीय अवस्था आहे. 


मराठवाडा रझाकारांच्या जुलमी राजवटीतून मुक्त व्हावा यासाठी त्यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ उभी राहिली. एकट्या हिंगोली जिल्ह्यातून तेव्हा 200 हून अधिक स्वातंत्र्यवीर रझाकारांशी लढण्यासाठी सज्ज झाले होते. त्यापैकी हुतात्मा बहिर्जी शिंदे हे एक होते.  हिंगोली जिल्ह्यातील वापटी हे बहिर्जी शिंदे यांचे गाव आहे. मराठवाडा स्वतंत्र व्हावा यासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये त्यांना सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे लढाईमध्ये गोळी लागली आणि 19 जुलै 1948 रोजी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पाश्चात्य आता त्यांचे नातू वापटी या गावांमध्ये राहतात. परंतु, शिंदे कुटुंब ज्या घरामध्ये राहत आहे त्या घराची अत्यंत दयनीय  अवस्था आहे. मराठवाडा स्वतंत्र झाला खरा परंतु आम्ही अजूनही पारतंत्र्यातच जगत असल्याची खंत हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या नातवांकडून व्यक्त केली जातेय. 
 
बहिर्जी शिंदे यांच्या नावाने सरकारच्या वतीने जिल्हा भरात वेगवेगळी स्मारकं उभारण्यात आली आहेत. बहिर्जी शिंदे यांच्या नावाने अनेक शिक्षण संस्था देखील उभ्या राहिल्या आहेत. परंतु, बहिर्जी शिंदे यांच्या वंशाजांना अगदी पडक्या घरात राहावे लागत आहे. गोडाऊन सारख्या एका हॉलमध्ये बहिर्जी शिंदे यांची समाधी आहे. भारत स्वतंत्र्य होऊन 75 वर्षे झाली. परंतु, जिथे बहिर्जी शिंदे यांच्या समाधीचा विकास नाही तिथे बहिर्जी शिंदे यांच्या वंशजांचा काय विकास होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. पडके असलेले घर आणि अल्पभूधारक असलेले बहिर्जी शिंदे यांचे नातू ज्ञानेश्वर शिंदे आणि भागवत शिंदे हे शेती आणि रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत.  
 
बहिर्जी शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणाची आहुती दिली. मराठवाडा रझाकाराच्या जुलमी राजवटीमधून मुक्त व्हावा आणि मराठवाडा विकसित व्हावा हा बहीर्जी शिंदे यांचा उद्देश होता. परंतु, त्यांच्या पाश्चात्य 75 वर्ष झाल्यानंतरही सरकारला स्वातंत्र्यवीराच्या कुटुंबाचा विसर पडला की काय असाच आता उपस्थित होतोय.