Heavy Rain in Marathwada and Vidarbha : राज्याच्या विविध भागात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नीगिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांचा संपपर्क तुटला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्याती तुफान पाऊस झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
  
नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे गेल्या 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळं वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. परंतू, याकडं जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्धापुर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे.




हिंगोली जिल्ह्यातही मोठा फटका


हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यानं नदीच्या काठावर असलेल्या कुरुंदा, किन्होळा, आसेगावं आणि टाकळगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. या गावातील 90 टक्के शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर या गावातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी देखील शिरलं आहे. दरम्यान, हळूहळू गावांमधील पाणी आता ओसरत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नदी काठच्या गावात पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालं आहे.  काही ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली आहे. तसेच संसार उपयोगी सर्व साहित्य पाण्यात भिजले आहे.


गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं कहर


गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली  मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. दरम्यान पुढच्या 72 तासात गडचिरोलीत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.




वर्धा जिल्ह्यातही मुसळधार


वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 10 ते 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. या काळात वर्धा जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.


नाशिकमध्ये 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु असून शिरसगाव - मुरंबी रस्त्यावरील घोडनदीला जोडणाऱ्या उपनदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळं जवळपास 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.


महत्वाच्या बातम्या: