अकोला : जगात दररोज कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचं रोगनिदान करणाऱ्या प्रयोगशाळांवर कामाचा फार मोठा ताण पडतो आहे. प्रयोगशाळांमध्ये तपासणी किट्सचा मोठा तूटवडाही जगभरात भासायला लागला. त्यामुळे प्रयोगशाळा तपासणीबरोबरच इतर काही संशोधनाचा कोरोनाचं रोगनिदान करण्यासाठी फायदा होईल का? याची जगभरातील बाधित देशांकडून चाचपणी व्हायला लागली. यातूनच युरोपमधील काही देशांसह अमेरिका आणि इटली या कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप असलेल्या देशांना एका संशोधनातून 'आशेचा किरण' दिसला. हे संशोधन आहे एका मराठमोळ्या तरूणाचं. डॉ. संतोष बोथे असं या तरूणाचं नाव आहे.
डॉ. संतोष बोथे यांनी आवाजाचं विश्लेषण करून रोगनिदान करण्याची एक पद्धत शोधून काढली होती. 2010 मध्ये त्यांच्या या संशोधनाला सुरूवात झाली. 'Voice Sample Based Disease Diagnosis' असं त्यांच्या संशोधन प्रकल्पाचं नाव होतं. तब्बल दोन वर्षांच्या संशोधनानंतर 2012 मध्ये त्यांच्या प्रयोगाला यश मिळालं. त्यांनी आवाजावरून रूग्णाच्या आजाराचं पृथ:क्करण करणारं उपकरण तयार केलं आहे. त्यांचं हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रात दुरोगामी परिणाम करणारं आहे.
नेमके काय आहे संशोधन
एखादा आजार झालेल्या रूग्णाच्या दैनंदिन आणि नैसर्गिक आवाजात आजारी पडल्यानंतर बदल होतो. हा बदल आजारानुसार वेगवेगळा असतो. आजारानुसार आवाजात झालेला बदल सामान्यत: लक्षात येत नाही. मात्र, डॉ. संतोष बोथे यांच्या संशोधनातून तयार करण्यात आलेलं उपकरण हे आजारानुसार आवाजात झालेला बदल, चढ-उतार सहज टिपतं. या बदलांचं विश्लेषण करून रूग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे?, याचं निदान या उपकरणाद्वारे होतं. त्यांच्या या संशोधनाचा फायदा हृदय रोग, मूत्रपिंड विकार, मज्जातंतू आणि मेंदू रोग आणि श्वसन विकाराच्या रूग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
चिंताजनक! राज्यात आज दिवसभरातील सर्वाधिक 552 कोरोना बाधितांची नोंद; एकूण आकडा 4200 वर
कोण आहेत डॉ. संतोष बोथे
डॉ. संतोष बोथे हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी या गावाचे रहिवाशी आहेत. संतोष यांचं घर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचं. संतोष यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात झालं. तर अकरावी-बारावीचं शिक्षण मंगरूळपीरच्या जिल्हा परिषद महाविद्यालयात पूर्ण केलं आहे. त्यांनी बीएससीची पदवी अकोल्याच्या आरएलटी महाविद्यालयातून पूर्ण केली आहे. तर पदव्यूत्तर शिक्षण नागपूरच्या रायसोनी महाविद्यालय येथे पूर्ण केलं आहे. तर पी.एच.डी आणि पुढील उच्चशिक्षण इटलीच्या रोम विद्यापीठात पूर्ण केले आहे. डॉ. संतोष बोथे सध्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील 'नरसी मोनजी विद्यापीठा'त 'इंनोव्हेशन हेड' म्हणून काम करतात.
डॉ. संतोष बोथेंच्या संशोधनाची परदेशात भूरळ
डॉ. संतोष बोथे यांची आवाजाच्या विश्लेषणावरून रोगनिदान पद्दतीचा वापर सध्या इटली आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. इटली आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकानी या पद्धतीचा वापर करीत 'कोविड-19' आजाराचे निदान करणे सुरु केले आहे. इटलीमधील रोम शहरातल्या 'तोर वेरगाटा विद्यापीठा'सह आणि तेथील रुग्णालयात या चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या उपकरणाचा आधार घेत 300 लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला. यात 98 टक्के लोकांच्या रोगनिदानाचे निकाल अचूक आलेत. अनेक परदेशी विद्यापीठे 'कोविड - 19' च्या चाचणीसाठी डॉ. बोथे यांच्या संशोधनावर आधारित 'व्हॉईस-बेस्ड मोबाईल ॲप' तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पद्धतीमध्ये रुग्णांना पूर्वनियोजित स्क्रिप्ट देण्यात येते. त्याचं वाचन करतांना त्यांचे आवाज रेकॉर्ड केले जातात. नंतर या नमुन्याचे 'आर्टीफिसिअल इंटेलिजन्स' ही पद्धती वापरून विश्लेषण करून रोगनिदान केले जाते.
औरंगाबादकरांसाठी खुशखबर! आज एकाच दिवशी पाचजण कोरोनामुक्त
यापूर्वी डॉ. बोथे आणि त्यांच्या चमूने रोम येथील 'सॅन जिओहॅनी बॅट्टीस्टा' (San Giovanni Battista) आणि 'आयआरसीसीएस सॅन रॅफेल पिसाना (IRCCS San Raffaele Pisana) येथे मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग, पार्किन्सन इत्यादी आजारांचे सफल निदान केले आहे. या पद्धतीची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. बोथे यांच्या चमूतील विद्यार्थी रश्मी चक्रवर्ती, प्रियांका चौहान - मोरे, प्रिया गर्ग, विधू शर्मा, रेश्मा निकम, श्रुती सराफ, विरुपाक्ष बस्तीकर यांना जाते.
डॉ. बोथेंचं संशोधन कोरोना रोग निदानासाठी अत्यंत किफायतशीर
सध्या कोरोनाच्या रोग निदानाचा खर्च एका रूग्णामागे 4500 रूपयांपर्यंत जातो. मात्र, डॉ. बोथेंच्या संशोधनाचा उपयोग केला तर हाच खर्च प्रतिरुग्ण एक रूपयापेक्षाही कमी होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या एका किटचा वापर करून दिड ते दोन लाख लोकांच्या चाचण्या होऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे. या एका किटची किंमत 15 ते 20 हजारांच्या दरम्यान आहे. या पद्धतीमुळे अतिशय जलद आणि कमी किंमतीत 'कोवीड-19' या आजाराचे स्क्रिनिंग आणि पॅथॉलॉजीच्या निष्कर्षांची पुष्टी करण्यास मदत होते. तसेच यामुळे पायाभूत वैद्यकीय सुविधांवरील सध्याचा ताण कमी होऊ शकतो. लोकेशन ट्रॅकिंग इंटिग्रेशनद्वारे 'हॉटस्पॉट' प्रवासी ओळखण्यास सरकारला मदत होऊ शकते. सोबतच स्मार्टफोनद्वारे चाचणी करून भारताच्या दुर्गम भागात पेहोचण्यासाठीही हा एक उत्तम उपाय होऊ शकतो.
औरंगाबादकरांसाठी खुशखबर! आज एकाच दिवशी पाचजण कोरोनामुक्त
डॉ. बोथेंचं संशोधन देशात उपेक्षित
अमेरिका आणि इटलीसारख्या देशांनी डॉ. बोथेंच्या संशोधनाचं कौतुक करीत उपयोग सुरू केला आहे. डॉ. संतोष बोथेंच्या संशोधनाला 'महाराष्ट्र वैद्यकीय संशोधन परिषदे'नं मान्यता दिली आहे. या मान्यतेनंतर राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर प्रकल्पही राबविले जात आहेत. यामध्ये मुंबई, पुणे आणि अकोल्याच्या प्रत्येकी एका वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहेय. तर नागपुरातील दोन वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बोथेंचा संशोधनावर प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या संशोधनाचा वापर देशपातळीवर केला तर वैद्यकीय क्षेत्रात बरेच बदल घडून येऊ शकतात. तसेच रोग निदानाच्या प्रक्रियेत रूग्णांचा मोठा पैसा वाचू शकतो.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रकोपानं देशातील वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवर कामाचा प्रचंड दबाव आणि ताण आहे. या परिस्थितीत रुग्ण आणि प्रयोगशाळेतील कर्मचार्यांपर्यंत येण्याचा धोका न घेता, दूरस्थपणे रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा हे संशोधन एक चांगला उपाय ठरू शकतो. या संशोधनातून देशाचा मोठा पैसाही वाचणार आहे. यातून आपल्या देशातील कोरोनाविरूद्धच्या लढाईला निश्चितच बळ आणि गती मिळू शकेल. त्यामूळे सरकार आणि व्यवस्थेनं या संशोधनाच्या सर्व बाजूंचा विचार करीत त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे आणि अडचणी दुर कराव्यात, हिच माफक अपेक्षा.
Ramdev Baba | लॉकडाऊनच्या काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ही योगासंन करा, रामदेव बाबांचं मार्गदर्शन