Sharad Pawar Speech in Sahitya Sammelan : आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकानी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केले आहे. लातूर येथील उदगीर येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
शरद पवार यांनी आपल्या भाषणातून देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी पवार यांनी म्हटले की, समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारची प्रोपागंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने 'माईन काम्फ' पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपागंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण असल्याकडे ही शरद पवार यांनी लक्ष वेधले.
साहित्य मुक्त असावे
आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले. साहित्य हे मुक्त असावे याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते असे पवार यांनी म्हटले. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे असे आवाहन त्यांनी केले. राज्यकर्ते थेटपणे प्रोपागंडा करत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसत असल्याचे पवार यांनी म्हटले.
कॉर्पोरेट हस्तक्षेपाने चौथा स्तंभ कोसळण्याची भीती
शरद पवार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कॉर्पोरेट क्षेत्राच्या हस्तक्षेपावर भाष्य केले आहे. कॉर्पोरेटचे छत्र हे प्रोपागंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे. हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हा धोका लक्षात घेतला पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटले.
महिला संमेलनाध्यक्षासाठी घटना दुरुस्त करा
महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी तर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिला अध्यक्ष निवड व्हावी अशी तरतूद व्हावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. पहिले साहित्य संमेलन 1878 मध्ये पार पडले. मात्र, महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळण्यासाठी 1961 साल उजाडावे लागले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.