Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषेला महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या मोबाईल युगातील मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अत्याधुनिक काळात आणि युवा साहित्य अकादमी विजेता लेखक प्रणव सखदेव पर्यंत मराठी बोली आणि मराठी प्रादेशिक बोली असा फरक केला गेला असला तरी या दोन्हीमध्येही मराठी साहित्य निर्मिती ही विपुल झाली आहे. विपुलतेचे प्रमाण हे मराठी बोलीला एकदमच प्राप्त झाले नाही तर त्यासाठी प्राचीन मराठी वाङ्मयापासून ते आधुनिक मराठी वाङ्मयापर्यंतचा वारसा लाभला आहे. या वारसा परंपरेतील एक नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी मराठी कविता अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवली असली तरी त्यांनी आपल्या भाषेचा अभिमान राखताना इतर भाषांचाही त्यांनी मान ठेवला म्हणून भारत सरकारतर्फे त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. 


कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण 'मराठी राजभाषा दिन' असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतराने तो विस्मृतीत गेला. त्यामुळे 1997 ला शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं.    


'मराठी भाषा गौरव दिन'
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते. त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. कुसुमाग्र यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले.   


'मराठी राजभाषा दिन'
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून 1 मे  दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर  करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अमराठी अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.


1 मे 1960 रोजी मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळे तो दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करणे अपेक्षित होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर काही वर्षे 1 मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जात होता. मराठी राजभाषा दिनासह याच दिवशी मराहाष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिनही साजरा करण्यात येत होता. परंतु, या दोन्ही दिवसांमुळे  ‘मराठी राजभाषा दिना’कडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी पुन्हा शासन निर्णय काढून 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.  28 एप्रिल ते 30 एप्रिल 1997 या तीन दिवशी विविध उपक्रम आयोजित करून 1 मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा करावा’ आणि त्याच दिवशी ‘मराठी राजभाषा दिवस साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे 1 मे रोजीच 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात येतो. 


'जागतिक मातृभाषा दिन' 
'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'प्रमानेच 21 फुब्रुवारी रोजी जागतिक 'मातृभाषा दिन' साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेनेच 21 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी दरवर्षी 'जागतिकक मातृभाषा दिन' साजरा केला जातो. 


तीनही वेगवेगळे दिवस
1 मे  रोजी साजरा होणारा 'मराठी राजभाषा दिन', 21 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा 'जागतिक मातृभाषा दिन' आणि 27 फेब्रुवारी रोजी  साजरा करण्यात येत असलेला 'मराठी भाषा गौरव दिन' हे तीनही दिन वेगवेगळे दिन विशेष आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.


महत्वाच्या बातम्या