Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचा सर्पदंशाने जीव जात आहे, त्यांनी असा काय गुन्हा केला? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. बळीराजाचा जीव वाचवण्यासाठी दिवसा वीज द्या, अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.


रात्री उसाला पाणी देत असताना शेतकऱ्याचा सापाला धक्का लागतो, साप चावतो, त्यामुळे शेतकरी मरतो. इतर वन्य प्राण्यांनी हल्ला झाल्यास शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार 14 लाख नुकसान भरपाई देते. मात्र, सर्पदंश झाल्यास भरपाई देण्याचा मुद्दा आल्यास सरकार म्हणते हा वन्य प्राणी नाही. असा ढोंगीपणा सरकारने बंद करावा असे शेट्टी यावेळी म्हणाले. रात्री वीज देता साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता असे म्हणत शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.
 
यावेळी एबीपी माझाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत. अद्याप आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. काल आंदोलनस्थळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तोंडी आश्वासन देखील दिले. मात्र, तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. आमची मागणी एवढीच आहे की, शेतकऱ्यांना रात्री 8 ते पहाटे 4 या वेळात वीज देऊ नका. त्यांना हा रात्रीचा वेळ सोडून कधीही वीज द्या. कारण या वेळात शेतकऱ्यांवर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उष्णतेमुळे साप बाहेर येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सर्पदंश होण्याची भिती आहे. सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.


एकीकडे खासगी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असून, दुसरीकडे शासनाचे प्रकल्प बंद पाडण्याचे काम सुरू आहे. यातून शेतकऱ्यांची गोची करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील 70 टक्के शेतकऱ्यांनी महावितरणची थकबाकी भरली आहे. थोडीफार थकबाकी शिल्लक आहे, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे जालिंदर पाटील म्हणाले. 


शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी  मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, बेमुदत धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनस्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणासाठी विविध ठिकाहू डबे येत आहेत. तसेच शेतकरी देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: