मुंबईमराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज बीड जिल्ह्यात (Beed News) हिंसक पडसाद उमटले. या हिंसाचाराची धग आता मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाणवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरांना लक्ष्य केल्याने गृहखात्याला उद्या जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे मंत्री आक्रमक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण केंद्रस्थानी असणार आहे. न्या. शिंदे समितीचा अहवाल उद्या सरकार स्वीकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे आज, मराठा आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी आमदार-खासदारांच्या बैठका उधळून लावण्यात आल्या. तर, बीडमध्ये हिंसक आंदोलनाने पेट घेतला. 


मराठा आंदोलकांच्या हिंसेच्या आगीत राष्ट्रवादीचे आमदार, नेते होरपळले आहेत. बीडमधील अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर बंगल्याच्या आवारातील वाहनांना आगी लावण्यात आल्या. तर, दुपारनंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका, ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावण्यात आली. क्षीरसागर कुटुंबीय एकत्र राहतात. क्षीरसागर कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या एका संस्थेच्या कार्यालयालादेखील आग लावण्यात आली. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवनला देखील आग लावण्यात आली. धुळे-सोलापूर हायवेवर बीड शहरानजीक असलेल्या 'हॉटेल सनराइज'ला संतप्त जमावाने आग लावली आहे. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या मालकीचे हॉटेल आहे.  या घटनांमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहेत.


पोलिसांचे अपयश? 


एकाच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या पोलीस प्रशासनावर नाराज आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गृह खात्याला जाब विचारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या कारभाराबाबत अजित पवार गटाचे मंत्री प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यामुळे उद्या फडणवीसांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यावर राष्ट्रवादीचे मंत्री प्रश्न उपस्थित करणार आहेत. गृहखात्याच्या कारभारावर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता अजित पवार गटही मंत्रिमंडळ बैठकीत गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :