नाशिक : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले असून कुठे गाडयांची जाळपोळ, कुठे बसेसची तोडफोफ तर कुठे राजकीय नेत्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. तर काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन सुरु असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात कुठे मशाल रॅली तर कुठे कँडल मार्च काढण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच राज्यभरात मराठा आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळत असून सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aarakshan) तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी केली जात आहे. 


नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) मराठा आंदोलनाची धग कायम असून जिल्ह्यातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अणे गावात उपोषण सुरु करण्यात येत आहेत. आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर मराठा समाजाने एकत्र रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र असून आमदार प्रशांत सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचं कार्यालय फोडण्यात आले. इकडे नाशिक जिल्ह्यातही आंदोलनासह शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात येत आहे. 


सकल मराठा समाजाला आरक्षण (Reservation) मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नाशिकरोड परिसरातील विहितगाव, वडनेर, पिंपळगाव खांब व पळसे या गावात मराठा समाजाच्या वतीने रविवारी कॅण्डल मार्चचे (Candal March) आयोजन करण्यात आले होते. विहितगावला लहान मुले तसेच महिलांनीही या मार्चमध्ये सहभाग घेतला होता. तर पळसेत महामंडालेश्वर शांतिगिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपोषणस्थळी उपोषण करणाऱ्यांची भेट घेतली. या वेळी 'एक मराठा.. लाख मराठा.... ' छत्रपती शिवाजी महाराज की जय..."आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे...' अशी सरकार विरोधात घोषणाबाजी करून कॅण्डल मार्च काढण्यात आले.


नाशिकमध्ये आज कँडल मार्च 


त्याचबरोबर नाशिक शहरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता कँडल मार्च काढण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून या कँडल मार्चला सुरवात होणार असून सीबीएस, शालिमार - मेन रोड - धुमाळ पॉइंट - एमजी रोड मार्गे पुन्हा सीबीएस असा कँडल मार्चचा मार्ग असणार आहे. 'मराठा आरक्षणासाठी आम्ही आता निर्वाणीचा लढा लढतोय. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न पाणी सोडले असून त्यांचे प्रकृती खालावत आहे. राज्य सरकार चालढकलपणा करत आहे. यामुळे मराठा समाज संतप्त झाला आहे. यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, अशी माहिती सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आली आहे.