Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीच्या बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती ठोक मोर्चातील (Maratha Kranti Morcha) काही लोक नाराज असल्यानं त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली. चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी सर्व समन्वयकांनी केली. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला.
चंद्रकांत पाटलांकडून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
मंगळवारी (18 एप्रिल) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, त्यांनी त्याची उत्तरे देता आली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम म्हणाले. चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केली. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यास सरकार कटीबद्ध
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच सरकारी अधिकाऱ्यांसह सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे हेदेखील उपस्थित होते. मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: