Maratha Reservation Update : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.


मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार


मराठा आरक्षणानुसार होणाऱ्या भरती प्रक्रियेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेश आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रवर आठवड्याभरात उत्तर सादर करण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे. 


नियुक्त्यांवर पुढील सुनावणी 10 एप्रिलला


याशिवाय, मराठा आरक्षणानुसारच्या नियुक्त्यांवर पुढील सुनावणी 10 एप्रिलला घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल 10 दिवसांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे.


मराठा आरक्षणाचा वाद न्यायालयात


राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधा गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. 


याचिकेतून अनेक गंभीर आरोप


निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही आव्हान देण्यात आलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे.


मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण


मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या कायद्यानुसार, ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून लागू असलेलं आरक्षण लागू असेल. पण ज्यांच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत, त्या नोंदी नसलेल्यांना सर्व मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरकारने केली होती. या आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मराठा आंदोलनातील हिंसा पूर्वनियोजित होती का? सरकारकडून SIT स्थापन, संदीप कर्णिकांच्या नेतृत्त्वात चौकशी!