मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मंजूर करणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, गटनेते, मंत्री यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले. राजकीय विरोध बाजूला ठेवून सामाजिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकत्र येतो हे पुन्हा सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य मंत्रिमंडळासह विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून शिक्षण देण्यासह शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिकप्रश्नी सर्व राजकीय पक्ष आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांचे आभार मानले.
तर दुसरीकडे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण देणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर कृतज्ञ उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाच्या यशस्वी आणि सामंजस्यपूर्ण सोडवणुकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर कार्यवाही करताना त्यावर कायद्याच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करून आज राज्य सरकारने सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल टाकले. त्यानंतर सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून करण्यात येत आहे. विशेषत: गेल्या काही दिवसांत या प्रश्नावर जनभावना तीव्र असताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय सामंजस्याने व मुत्सद्देगिरीने सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन आरक्षणाच्या मागणीवरुन निर्माण झालेला पेच सोडवला.
विशेष म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे एकमत तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन करीत आहे. या ठरावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अनुमोदन दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्र्यांचा गौरव केला. अत्यंत संवेदनशील झालेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर संयम आणि समन्वयाने तोडगा काढून महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व मतैक्य घडवून आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
मराठा आरक्षणासारख्या सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करीत असताना राज्य मंत्रिमंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचा आभारी असल्याच्या भावना या अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. विशेषत: यासंदर्भात स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दिलेल्या योगदानाचा त्यांनी कृतज्ञ शब्दात उल्लेख केला.
मराठा आरक्षण : राजकीय विरोध बाजूला ठेवून एकमेकांचे आभार मानले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2018 11:33 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, गटनेते, मंत्री यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले. राजकीय विरोध बाजूला ठेवून सामाजिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकत्र येतो हे पुन्हा सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -