मुंबई : शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूली केली जाणार नाही किंवा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली. तसेच मुंबईत अदाणी इलेक्ट्रीसिटी या कंपनीकडून ग्राहकांच्या वीज बिलात नियमबाह्य पैसे आकारले गेले असतील तर ते पैसेही ग्राहकांना परत देण्यात येतील असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


आ. प्रकाश गजभिये यांनी राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणार का? तसेच वीज कनेक्शन तोडण्यासं‍बंधित प्रश्नावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री म्हणाले की, राज्यात 45 लाख शेतकऱ्यांवर 35 हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरण जी वीज 6 रूपयाने घेते ती वीज शेतकऱ्यांना 1 रूपये 80 पैशांनी दिली जाते. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वीज बिल वसूली करू नये तसेच वीज कनेक्शनही तोडले जाऊ नये असा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती पाहून कोण्यात्याही शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूली केली जाणार नाही असेही ऊर्जामंत्र्यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.

ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, उन्हाळयात महाराष्ट्रात कुठेही भारनियमन केले जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. यासाठी 20 लाख टन परदेशी कोळसा आयात करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त डब्ल्युसीएल, एमसीएल, एसईसीएल या कंपन्यांकडून अतिरिक्त कोळसा पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. कोयनेचे पाणी ही जपून ठेवण्यात आले आहे. उन्हाळयात कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाईल. आ. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री बोलत होते.