Chhatrapati Shivaji Maharaj : मराठ्यांचा धगधगता इतिहास आणि त्यातील एक एक लढाई म्हणजे अंगावर रोमांच उठवणाऱ्या कथा. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरले ते इथल्या मावळ्यांच्या बलिदानाने. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते अशा किती जणांची नावे घ्यायची. यातच एक नाव होतं ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) आणि बांदल सैनिक (Bandal). सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यात (Battle of Pavan Khind) अडकलेल्या शिवरायांना सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचवलं आणि तोपर्यंत जीवाची बाजी लावलेले बाजीप्रभू आणि बांदल सैन्य. त्यांच्या शौर्याने घोडखिंड पावन झाली.


शिवरायांनी अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा काढला आणि विजापूर हादरले. ज्याला आपण पहाड का चुहा समजत होतो त्या शिवाजीला कसं पकडणार हा प्रश्न आदिलशहा सामोर होता. अफजलखानाच्या लाखोंच्या सैन्याला गर्दीस मिळवल्यानंतर हे आव्हान पेलण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. अशा ज्या सिद्दी जौहरने (Siddi Jauhar) हा विडा उचलला आणि भलंमोठं सैन्य घेऊन तो पन्हाळ्याच्या दिशेने आला. सोबत अफजलखानचा मुलगा फाजलखान होता.


लढाईसाठी पन्हाळ्याची निवड (Panhala Fort History) 


त्यावेळी राजे (Chhatrapati Shivaji Maharaj) पन्हाळ्यावर होते आणि त्यांना माहित होतं की आदिलशहा आपल्यावर चाल करून येणार आहे. त्यामुळे आदिलशाहाला स्वराज्यापासून रोखायचं असेल तर पन्हाळा हा उपयुक्त किल्ला. भक्कम तटबंदी असलेला, उंच आणि विस्तीर्ण जागा, मुबलक पाणी आणि कोणतेही आक्रमण सहन करू शकेल इतकी क्षमता असलेला हा किल्ला. त्यामुळे राजांनी पन्हाळ्याची निवड केली. त्यातूनही काही दगाफटका झालाच तर जवळ विशाळगड (Vishalgad Fort) आणि रांगणा आहेच.


आदिलशहाच्या हजारोंच्या सैन्याला भिडायचं असेल, वेळप्रसंगी सुटका करून घ्यायची असेल तर डोंगर कपारीत लढणाऱ्या सैन्याची साथ हवी म्हणून शिवरायांनी आधीच मावळ प्रांतातल्या बांदल (Maval Bandal) सैनिकांना बोलावलं होते.


सिद्दी जौहारची पन्हाळ्याला मगरमिठी 


एखाद्या माजलेल्या हत्तीसारखा सिद्दी जौहर आला आणि त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. मार्च महिन्यात घातलेला वेढा जून संपला तरी सुटत नव्हता. उलट अधिक कडक होत होता. दुसरीकडे औरंगजेबचा (Aurangzeb) मामा शाहिस्तेखान पुण्यावर चाल करून आला होता. राजेंना काही सूचत नव्हतं. काहीही करून हा वेढा फोडायचा असा निर्धार त्यांनी केला.


जुलैचा महिना म्हणजे पन्हाळ्यावर धो धो पावसाचा. त्याचाच फायदा घेऊन राजांनी गनिमी कावा करायचा ठरवला. पन्हाळ्याच्या चाव्या तुझ्याकडे देतो आणि आदिलशाहाची सेवा करतो असं सांगून राजांनी सिद्दीला खेळवत ठेवलं. त्यामुळे शिवाजी महाराज आता शरण येणार या आनंदाने सिद्दीच्या सैन्याचा वेढा काहीसा शिथिल झाला आणि नेमकी हीच संधी राजेंनी साधली.


गनिमी काव्याने डाव साधला 


शिवाजी महाराजांनी आपल्यासारखाच दिसणाऱ्या शिवा काशिदला (Shiva Kashid) हेरलं. शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरेन, जीवाचं सोनं होईल या आनंदाने शिवा काशिद मरायला तयार झाला. 12 जुलै 1660 ची पौर्णिमेची रात्र शिवरायांनी यासाठी निवडली. त्याच्या आधी बहिर्जी नाईकनी (Bahirji Naik Maratha Spy) विशाळगडला (Panhala To Vishalgad) जाणारा मुख्य रस्ता सोडून घोडखिंडीमार्गे जाणाऱ्या रस्त्याची रेकी केली होती आणि त्याच मार्गाने राजे 12 जुलैच्या रात्री 600 बांदल मावळ्यांसह निसटले.


एका पालखीत स्वतः राजे बसले, ती पालखी आडमार्गाने विशाळगडला निघाली तर दुसऱ्या पालखी शिवा काशीद बसला. ती पालखी मुख्य मार्गाने निघाली. शिवा काशीदची पालखी सिद्दीच्या सैन्याने पकडली. शिवा काशीदला शिवाजी महाराज म्हणून सिद्दी जोहरच्या समोर उभे केले. पण त्या ठिकाणी असलेल्या फाजलखानने हा शिवाजी नसल्याचे सांगितले आणि सिद्दीच्या पायाची आग मस्तकात गेली. आपण फसलो गेलो याचा त्याला संताप आला. सिद्दीने शिवा काशिदला ठार केला आणि त्याचा जावई असलेल्या सिद्दी मसूदला शिवरायांच्या मागे पाठवले.


लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे  


इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड (Gajapur Khind Panhala) गाठली होती. मागे असलेला गनिम जवळ आला होता. अशावेळी बाजीप्रभूंनी शिवरायांना 300 सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले. शिवरायांनी इथपर्यंत आलो, जे काय होईल ते इथेच होईल असं म्हणत लढण्याचा निर्धार केला.


त्यावर स्वामीनिष्ठ असलेल्या बाजीप्रभूंनी उत्तर दिलं. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हा बाजी जीवाची बाजी लावून खिंड लढवेल, छातीची ढाल करून गनिमास इथेच थांबवेल. विशाळगडावर जाऊन तुम्ही तोफेचा इशारा द्या, तोपर्यंत हा बाजी मरणार नाही. त्यानंतर 300 मावळ्यांसोबत बाजीप्रभू तिथेच थांबले आणि 300 मावळ्यांसोबत शिवराय आणि रायाजी बांदल विशाळगडच्या दिशेने कूच झाले.


घोडखिंड (Ghodkhind) तशी अवघडच, एकाच वेळी काही मोजकेच लोक आत जातील अशी ती खिंड. या खिंडीच्या तोंडाशी बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि 100 बांदल मावळे उभे. त्याच्या मागे पाच-पाचच्या गटाने मावळे... खिंडीच्या वरती गोफनीने दगडाचा मारा करणारे मावळे आणि शेवटी 50 बांदलांची तुकडी. यांना पार करून गनिम पुढे जाणे शक्यच नव्हतं.


या खिंडीत सिद्दी मसूदचे पाच हजाराचे सैन्य आणि मराठ्यांचे 300 बांदल एकमेकांना भिडले. एका हातात दांडपट्टा आणि दुसऱ्या हातात तलवार असे रौद्र रूप धारण केलेले बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतीने त्वेषाने लढणारे बांदल मावळे... यामुळे एकाही गनिमाला पुढे जाता येत नव्हतं. बांदल सैन्याच्या रक्ताने खिंड लालेलाल झाली होती. बाजीप्रभू रक्ताने भिजले होते, मावळे रक्तबंबाळ झाले होते. पण एकेक मावळा पर्वताप्रमाणे भक्कम उभा होता.


Baji Prabhu Deshpande History : बाजीप्रभू धारातीर्थी पडले


बाजीप्रभूंचे बंधू फुलाचे प्रभू हे धारातीर्थी पडले. सलग अठरा तास, कुठेही विश्रांती न घेता... काहीही न खाता बांदल सैन्य लढत होते... बाजीप्रभूची तलवार विजेप्रमाणे तळपत होती, गनिमाचे शीर धडावेगळे होत होते. हे फक्त आपल्या राजाला सहीसलामत विशाळगडावर पोहोचवण्यासाठी.


एवढ्या मोठ्या सैन्यालाही खिंड पार करता येत नाही, हे मराठे कुठल्या रक्ताचे बनले असतील असा प्रश्न सिद्दी मसूदला पडला असेल. शेवटी त्याने माचीवरील एका सैनिकाला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदुकीतून काढलेला बार थेट बाजीप्रभूंच्या छातीत घुसला, बाजीप्रभू खाली कोसळले. पण अजूनही तोफेंचा आवाज ऐकू येत नसल्याने मराठे लढतच होते. 


Vishalgad Fort History : विशाळगडचा वेढा फोडला 


दुसरीकडे सिद्दी जौहरने आधीच विशाळगडवर (Vishalgad Fort History) सुर्वे आणि दळवी सरदारांना पाठवून वेढा दिला होता. हा वेढा शिवरायांनी फोडला आणि विशाळगडवर प्रवेश केला. विशाळगडावरून पाच तोफांची सलामी देण्यात आली आणि बाजीप्रभूंनी जीव सोडला. इकडे घोडखिंडीत लढणारे सैन्य जंगलात गायब झालं.


बाजीप्रभूंनी आणि बांदल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, हैबतराव बांदल, विठोजी काटे या मोहऱ्यांनी बलिदान दिलं. बांदल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं. 


दरवर्षी 12 आणि 13 जुलै रोजी या ठिकाणी हजारो शिवभक्त जमा होतात. बाजीप्रभू आणि शेकडो बांदल सैन्याच्या शौर्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. 


ही बातमी वाचा: