Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) हालचाली सुरू आहेत. तर, दुसरीकडे अद्यापही खातेवाटपाचा तिढा कायम आहे. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, खातेवाटप जाहीर झाले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता दिल्लीत धाव घेतली आहे. खातेवाटपावर भाजप श्रेष्ठींसोबत चर्चेची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्ली दौऱ्यात आहेत, अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीगाठींमधूनही खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या एन्ट्रीने शिवसेना-भाजप खातेवाटपाची समीकरणं बिघडली आहेत. जी खाती शिवसेना-भाजपकडे जाणार होती, त्यापैकी 9 मंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कोटा कमी झाला आहे. एकूण 42 पैकी उरलेल्या 14 मंत्रिपदांमध्ये तीनही पक्षांना कसं सामावून घ्यायचं असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीचे सर्व 9 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यमंत्रिपदाची अपेक्षा राष्ट्रवादीला असू शकते. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आपलं मंत्रिपदाचा आकडा कमी झाल्यामुळे नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली जात आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं हवं असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला आहे. त्यामुळे खातेवाटपावरून तिढा वाढला असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत बंड करणाऱ्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात पक्षपाती केला जात असल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपात राष्ट्रवादीकडे अधिक निधी कसा दिला जातोय याची आकेडवारी जारी केली होती.
दिल्ली वारीत तिढा सुटणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत भाजप श्रेष्ठींची भेट घेऊन खातेवाटपाचा तिढा सोडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.