Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. एकीकडे शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे वाढलेल्या गारठ्यामुळे शेकडो शेळ्या-मेंढ्या मृत झाल्या आहेत. अहमदनगर, सातारा, नाशिक, पुण्यात मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई आणि खटाव तालुक्यात रात्रभर पाऊस झाला होता. या पावसाने पिकांचे नुकसान केले तर केले शिवाय दोन घटनांमध्ये 35 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वाई येथील देगाव येथे मेंढपाळ शिवाजी धायगुडे यांनी आपल्या बकऱ्या शेडमध्ये बांधल्या असताना रात्री मुसळधार पाऊस आणि पहाटेची थंडी यामुळे गोठ्यात बांधलेल्या वीस बकऱ्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री मुसळधार पाऊस आणि पहाटेची अचानक पडलेली थंडी यामुळे हवामानात मोठा बदलाव झाला आणि कळपातील 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा बकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असाच काहीसा प्रकार खटाव तालुक्यातील मेघलदरे गावात घडला. दुष्काळी भाग सजमल्या जाणाऱ्या या मेघलदरे गावातील कुमार मदने नावाच्या शेतकऱ्याच्या बकऱ्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत बांधल्या होत्या. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात बांधलेल्या 15 बकऱ्या भिजल्या आणि त्यांचा गारठून मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढ्यांचा मृत्यु झाला. 23 गावांमध्ये 500 हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची झाला असल्याचे म्हटले जात आहे. मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथे चार शेतकऱ्यांच्या जवळपास 100 तर, कर्हे शिवारातील दोघा शेतकऱ्यांच्या १४ मेंढ्या, देवळा तालुक्यातील दहिवड शिवारातील दोघा शेतकऱ्यांच्या 16 मेंढ्या, येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथील दोघा शेतकऱ्यांच्या १२ मेंढ्या मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुण्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि कडाकाच्या थंडीमुळं तब्बल 250 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये 40 मेंढ्या-शेळ्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. खडकीमध्ये 40 ते 45 मेंढ्या, शिंगवेमध्ये 20 ते 25 आणि धोंडमाळ शिवारमध्ये 30 ते 35 मेंढरू मृत्यूमुखी पडले आहेत.
बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात पाचशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यु झालाय. हा आकडा आणखीही वाढू शकतो असं पशुसंवर्धन विभागाने म्हटलंय. वर्षाच्या या कालावधीत पाऊस पडत नसल्याने मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी बाहेर पडतात. मात्र काल सलग चोवीस ते छत्तीस तास पाऊस पडल्याने शेळ्यांचा गारठून मृत्यु झालाय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांच जास्त नुकसान झालय.