Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan नाशिक : उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांचा मेळा अखेर भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना समोरचे संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट. त्यानंतर त्यावरही कसंबसं मात करुन संमेलन दोन दिवसांवर आलं असताना आलेला हा अवकाळी पाऊस.
साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची वाट वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan) देखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्थान- भाजपचा आरोप
भाजप नेत्यांनी आरोप लावत म्हटलं होतं की, साहित्य संमेलन एकतर्फी होत आहे. संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न देता जाणुन बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला. भाजपच्या तिन्ही आमदारांनी 10/10 लाखांचा निधी दिला,महापालिकाने 25 लाख निधी देऊनही भाजपच्या नेत्यांना स्थान नसल्याने आयोजकांचे चांगलेच कान टोचले होते. साहित्य संमेलनात साहित्यिकांचा सन्मान राखला जावा. संमेलन सर्व समावेशक असावे एकतर्फी असू नये, असं त्यांनी म्हटलं. ग्रंथ दिंडी नशिकमध्ये निघणार असल्याने केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. या आधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला आहे.
संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आता अवकाळी पावसाचे संकट
वादावर कसेबसे मार्ग काढत संमेलन अंतिम टप्पात आले आणि काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
94 व्या साहित्य संमेलनादरम्यान पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
संमेलनासंबंधी या बातम्याही नक्की वाचा
साहित्य संमेलन पुन्हा वादात! संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच स्थान, भाजपची तीव्र नाराजी
94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट