विरोधीपक्षातील अनेक नेते भविष्यात शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा कुठल्याही हेतूसाठी नाही किंवा कुठल्याही पदासाठी नाही, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

नाशिक : विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीत साधारण तीन महिने राहिले असल्याने अनेक राजीनामे याच आठवड्यात येतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील किती आमदार आणि नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा कुठल्याही हेतूसाठी नाही किंवा कुठल्याही पदासाठी नाही, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरेंना सामाजिक प्रश्नांची उत्तम जान आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राचं नेतृत्व करु शकतात, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करतील आणि आगामी विधानसभा निवडणूक ते शिवसेनेच्या तिकीटावर लढतील या चर्चांवरही एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागेसंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या


















