पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर गंभीर आरोप करत थेट इशारा देखील दिला आहे. 'आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही, आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकराला दिला आहे. 


मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की," मराठा समाज एकत्रित आहे, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपण घेतलं तर बरं राहील. समाजाला वेड्यात काढन सोडावं. आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षांवर्ष खुला राहणार नाही,  हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहे हे सरकारलापण कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाप करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे. 


मी मरायला भीत नाही : मनोज जरांगे...


दरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,“ आंतरवालीत काही चूक नसताना सरकारने प्रयोग केला. त्यामुळे आम्ही यावेळी सावध आहोत. आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही, तर आरक्षण सोडून अनेक प्रश्न आहेत. त्यात जर दरी निर्माण झाली, तर पुन्हा ते कधीही एकत्रित येणार नाहीत. सरकार झोपी गेलंय का? त्यांना हे दिसत नाही का?, लेकरं मोठी करायची तर संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. शांततेत आमरण उपोषण करणारच, समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा भीत नाही, असेही जरांगे म्हणाले. 


जरांगेंविरोधातील याचिकेची सुनावणी 24 जानेवारीला 


मनोज जरांगे यांना मुंबई येण्यापासून रोखा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवते मोहिते-डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने 24 जानेवारील सुनावणी निश्चित केली. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही?; मनोज जरांगे म्हणाले, ते तर....