जालना: मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल, अशी अनेकांची धारणा आहे. मात्र, या विशेष अधिवेशनापूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत चर्चा केली नाही, तर आगामी काळात भयंकर असे मराठा आंदोलन उभे राहील. हे आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप या शब्दाची व्याख्या काय असते, याची प्रचिती येईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) कायद्यासाठी राज्य सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनाचा काहीही फायदाच होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशनापूर्वी अंतरवाली सराटी येथे मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नसल्याचे सांगितले. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज झुंजत आहे. आम्ही मागणी एक केली आणि सरकार करतंय दुसरंच. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा १५० ते २०० मराठ्यांनाच मिळणा आहे. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातील आमचं आरक्षण आम्हाला द्या, अशी आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करु, असा शब्द दिला होता. मग त्याची अंमलबजावणी करा. विशेष अधिवेशनात सुरुवातीला तातडीने सगेसोयऱ्यांचा विषय चर्चेला घ्या आणि तातडीने अंमलबजावणी करा. अन्यथा राज्यात मराठा समाजाचे भयंकर आंदोलन उभे राहील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे: जरांगे-पाटील
दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकलं नाही तर तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारं आमचं आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की ६ करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला.
सरकारचे प्रतिनिधी त्यांच्या सोयीने माझ्याकडे येतात, बाकी गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ: मनोज जरांगे
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. गेल्या कित्येक दिवसांत राज्य सरकारचे शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी आपल्याशी चर्चा करायला आला नसल्याबद्दल जरांगे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येतो. त्यांच्या सांगण्यानुसार वागलो तर आपण चांगले ठरतो. खरं बोलू नका, खोटं बोला, हे माझ्याकडे चालत नाही. मी तुमच्यासाठी माझ्या समाजाचे वाटोळे करु शकत नाही. त्या लोकांना कामं असतात, ती मोठी लोकं आहेत, त्यांच्या विमानाचा खर्च वाया जातो. ते विमानातील डिझेलसाठी गरिबांचा पैसा उडवतात. हा देव, त्यो देव करत फिरतात. पण त्यांच्याकडे सामान्य मराठ्यांचा आक्रोश, किंकाळ्या बघायला वेळ नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आणखी वाचा