बारामती : अजित पवार यांनी सलग दोनवेळा बारामती लोकसभेसाठी भावनिक आवाहन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा बारामती खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू करण्यात आला आहे. आज (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मूहुर्त साधत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू करण्यात आला.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे गेलं आहे. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल? याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला माझ्या विचाराचा उमेदवार निवडून नाही दिला तर मी विधानसभा लढवणार नसल्याचे वक्तव्य केले होते. असे असतानाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणुकीपूर्वच बारामतीत प्रचाराचे बिगुल वाजले आहे. 


सुप्रिया सुळेंकडून मोजक्याच शब्दात बारामतीच्या 'भावनिक' लढाईवर उत्तर


दुसरीकडे, घरातील व्यक्ती माझ्याविरुद्ध लढली तर काय हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्या आज बोलताना म्हणाल्या की, माझं काम बघा, माझ्यावर भ्रष्टाचार कधीच आरोप झाला नाही. मी मुख्यमंत्री होण्याचा विषय येतो कुठे? मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा तिकीट मागितले आहे. लोकशाही मत मांडण्याचा अधिकार असून विरोधक दिलदार असला पाहिजे. वैचारिक लढाई असल्यास घरातील व्यक्ती माझ्याविरुद्ध लढली तरी काय हरकत नाही. 


अजित पवार यांनी सेल्फीवरून केलेल्या टीकेवरून सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सगळे आई वडील म्हणतात की मुलांना सांगितलं आहे फॉर्म भरून सेल्फी काढून पाठवायला. रेल्वे स्टेशन, शाळा, सगळीकडे. प्रधानमंत्री सांगतात सेल्फी काढा. एखादा सेल्फी काढून व्यक्ती खुश होते, तो आनंद वेगळाच असतो, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. 


शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू


दरम्यान, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांनी बारामतीत पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. तत्पूर्वी, शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत झालेल्या कार्यक्रमात चंद्रराव तावरे यांच्यासोबत एकाच मंचावरती दिसल्या. महायुतीत असलेल्या अजित पवारांनीही बारामतीची निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे. त्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केलीय. 


इतर महत्वाच्या बातम्या