Pune Crime News : पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे (Pune)  पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री केली जात होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 


पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांवर थेट कारवाईचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) मिळून आले. तब्बल साडेतीन कोटींचे एमडी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीठ विक्रीच्या आडून हे रॅकेट सुरू होते. तसेच आरोपींच्या मागावर गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत. 


अशी झाली कारवाई...


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट 1 च्या पथकाला सोमवार पेठेत एक चारचाकीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा एमडी ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे एक कोटीचे एमडी (500 ग्रॅम) आढळून आले. पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी एमडी देणाऱ्या हैदर शेखची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी हैदर शेखला ताब्यात घेतले असता, त्याच्या ताब्यात एक कोटीचे (500 ग्रॅम) एमडी आढळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्या मिठाच्या गोडाऊनमध्ये आणखी दीड कोटीचे (750 ग्रॅम) एमडी सापडले. 


ललित पाटील प्रकरणानंतर सर्वांत मोठी कारवाई


मागील काही दिवसांत पुण्यात ड्रग्स विक्रीचे प्रमाण वाढले आहेत. अशात पुणे पोलिसांनी 100 कोटीपेक्षा अधिकचे ड्रग्स पकडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार साडेतीन कोटींपेक्षा अधिकेचे हे ड्रग्स असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 2023 मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात सव्वादोन कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कुणाकुणाचे नावं समोर येतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद