अहमदनगर: कोरोना संकटानंतर आता सावरत असलेल्या तमाशाला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर दसरा ते दिवाळी दरम्यान मराठवाड्यात होणाऱ्या तमाशांना (Tamasha Fad) पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य तमाशा फड संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सरकारने यात हस्तक्षेप करून आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
मराठवाड्यातील बीड असेल, जालना असेल किंवा औरंगाबाद असेल यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दरवर्षी दसरा ते दिवाळी दरम्यान तमाशाचे फड असतात. ऊस तोडणी कामगारांची संख्या या भागात अधिक असल्याने दिवाळीपूर्वी ऊस तोडणी कामगार हे दुसऱ्या शहरात जातात. त्यामुळे जवळपास 20 फड मालकांना या बंदीचा फटका बसण्याची शक्यता रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी मोठी सभा घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणली. येत्या काही दिवसातही त्यांच्या या भेटीगाठी सुरू असतील.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रक देण्यात यावं यासाठी त्यांनी मागणी केली असून त्यासाठी राज्य सरकारला त्यांनी 40 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. येत्या दहा दिवसात ती मुदत संपणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक ठिकाणी होणाऱ्या तमाशांच्या फडांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या सभांचा फटका हा मराठवाड्यातील जवळपास 20 फडांना बसत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, सरकारला दिलेल्या 40 दिवसांपैकी 10 दिवस उरले असून या दहा दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. शिवाय 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरेल असंही जरांगे म्हणाले. शनिवारी झालेल्या विराट सभेसमोर जरांगेंनी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजाला उसकवा, असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. शिवाय सरकारनं आपलं फेसबुक अकांऊटही बंद केल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे.
ही बातमी वाचा: