Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जांबरगाव टोल नाक्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 23 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आता यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली. तसेच, समृद्धीवरील अपघातातील मयत आरटीओच्या वाटमारीचे बळी असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली. यावेळी हा अपघात कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. समृद्धी महामार्गावर गेलेले बळी आरटीओच्या वाटमारीचे आहेत असं देखील दानवे म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. अपघाताची चौकशी व्हावी, खरच आरटीओने ट्रक थांबवलं का, चिरीमिरीसाठी आरटीओची कारवाई सुरू होती का?, याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच, रात्री ड्युटीवर असलेल्या आरटीओवर कारवाई व्हावी, 17 जणांची परवानगी असलेल्या बसमध्ये 30 वर लोक कसे, या रसत्यावर लोक येतात कसे अशा पद्धतीने, कुणी गाड्या तपासात नाही का? त्याची ही चौकशी व्हावी अशीही मागणी दानवे यांनी केली आहे.
अपघातस्थळाची दानवेंकडून पाहणी...
दरम्यान या घटनेबाबत दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की. "समृद्धी महामार्गावरील रात्री झालेल्या अपघातात आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एका चिमुकिलीचा समावेश आहे. घटना अत्यंत दुःखद आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे हलवण्यात आले आहे. समृद्धीवर होणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरुच आहे. मृतातम्यांना श्रद्धांजली. तातडीने जाऊन अपघातस्थळाची आणि वाहनांची पाहणी केली" असल्याची माहिती दानवे यांनी दिली.
खमींच्या प्रकृतीची विचारपूस
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबादास दानवे यांनी वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन समृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघातात उपचार सुरू असलेल्या जखमींची भेट घेतली. जखमींच्या प्रकृतीची यावेळी विचारपूस करून त्यांना अपघाताच्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी धीर दिला.
पालकमंत्री संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया...
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातास्थळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भेट दिली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या लोकांची त्यांनी विचारपूस केली आहे. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती देखील जाणून घेतली. तसेच, घडलेल्या सर्व घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: